पोलिस निरीक्षकावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

लोणी काळभोर - नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक महेश शिवलिंगप्पा तेलगंजी (रा. मोरे वस्ती, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांच्यावर यवत (ता. दौंड) येथे चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर मोटार पळवून नेली. सोमवारी (ता. ११) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

‘एर्टिगा’ या मोटारीतून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत वीज उपकेंद्रासमोर सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तेलगंजी यांच्यावर हल्ला केला. तेलगंजी यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी तेलगंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यवत पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

महेश तेलगंजी आज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या स्विफ्ट डिझायर मोटारीतून (क्र. एमएच १२ एनयू ९२४४) दौंड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात निघाले होते. साडेसहाच्या सुमारास त्यांची गाडी यवत वीज उपकेंद्रासमोर आली असता, मागून आलेल्या ‘एर्टिगा’मधील एकाने तेलगंगी यांना, ‘तुमच्या गाडीच्या मागच्या चाकाचे डिस्क निघाले आहे,’ असे सांगितले. यावर डिस्क निघाल्याची पाहण्यासाठी ते गाडीमधून उतरून चाकाची पाहणी करत असतानाच ‘एर्टिगा’मधील उतरलेल्या दोघांनी त्यांना मागून पकडले व लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने स्विफ्टची चावी काढून घेतली व गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेलगंजी यांनी मारहाण करणाऱ्यांना प्रतिकार करण्याबरोबरच ओरडण्यास सुरवात केली. हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर रिवॉल्व्हरमधून गोळी झाडली. ती पायाला लागल्याने ते कोसळले. याचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले.