हेलिकॉप्टर पुढे गेले आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

‘हेलिकॉप्टर पूर्णपणे थांबण्यापूर्वीच पायलटने उतरायला सांगितले, तसेच चढतानाही हेलिकॉप्टर सुरूच ठेवले होते. बसायला जाण्यापूर्वीच हेलिकॉप्टर पुढे पुढे जाऊ लागल्याने मी धावत बाजूला गेलो. हेलिकॉप्टर पुढे पुढे गेले आणि माणसे समोर दिसल्याने उडून खाली आले... हे सगळे गंभीर आणि आश्‍चर्यकारकच होते...’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी रायगड येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबतचा थरार स्वत:च विधान परिषदेत सांगितला.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला लातूर येथे मे महिन्यात झालेल्या अपघाताबाबतचा प्रश्‍न काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी लातूरबरोबरच रायगड येथील अपघाताबाबत सभागृहाला सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी सांगितले की, जुन्या हेलिपॅडबाबत ऑडिट सुरू आहे. हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी परवानगी देताना तसेच हेलिपॅडसाठीचे स्थळ निवडताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतची निश्‍चित नियमावली तयार करण्यात येत आहे. यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी घ्यावी लागणारी दक्षता यासंदर्भात मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येतील.   

लातूर येथील दौऱ्यादरम्यान शासनाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याने दुसरे हेलिकॉप्टर विकत घेईपर्यंत दीर्घकालीन भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर वापरण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. निलंगा (जि. लातूर) येथे झालेली दुर्घटना दुर्दैवी व गंभीर होती. निलंगा अपघाताची ‘डीजीसीए’ने गंभीर दखल घेतली असून, ‘एएआयबी’मार्फत याची चौकशी समिती नेमून स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. मात्र, यापुढे वारंवार अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

राज्य शासनाकडे उत्कृष्ट दर्जाचे हेलिकॉप्टर होते. त्याचा विमाही काढण्यात आलेला होता. ते दुर्घटनाग्रस्त झाल्याने नवीन हेलिकॉप्टर विकत घेईपर्यंत ‘डीजीसीए’ने मान्य केलेल्या ऑपरेटरकडून सर्व नियम पाळून हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. तरी रायगड जिल्ह्यात हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना अचानक हेलिकॉप्टर सुरू झाले होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. तरीही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा संबंधात हयगय झाली असल्याने या घटनेची चौकशी उच्च अधिकार समितीमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news Maharashtra CM Devendra Fadnavis helicopter