एसटी संप: चर्चा निष्फळ, हाल कायम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी! 
एसटीने कर्मचाऱ्यांना 2,500 रुपयांचा बोनस जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरही त्याची खिल्ली उडविण्यात आली. इतकी रक्कम ठेवायची कुठे इथपासून त्यावर कॉमेंट्‌स करण्यात आल्या. 

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तिढा आज दुसऱ्या दिवशीही सुटू शकला नाही. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची सलेहोलपट आज ऐन दिवाळीतही कायम राहिली. 

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत एसटी प्रशासन; तसेच मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या किमान चार बैठका झाल्या. मात्र त्यात कसलाही तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशीही त्यांची बैठक होऊ शकली नाही. ही बैठक उद्या होण्याची शक्‍यता आहे. 

कामगार संघटनांच्या अवास्तव मागण्यांमुळे तोडगा निघू शकत नसल्याचा दावा चर्चेतील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. कामगार संघटना सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर अडून बसल्या आहेत; तर वेतन आयोग दिला तर कर्मचाऱ्यांना केवळ एकच पगार देता येईल, नंतर एसटी चालविण्यासाठी पैसेच उरणार नाहीत, असे प्रशासनाचे सांगणे आहे; तर कामगार संघटनांनी सातवा आयोग हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने त्यांना आता या मुद्यावर एक पाऊलही मागे घेणे कठीण झाले आहे. अशा विचित्र परिस्थितीत दोन्ही बाजू माघार घ्यायला तयार नसल्याने हा प्रश्‍न आज अनिर्णित राहिला. त्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी झाला असला तरी प्रवाशांना रेल्वे किंवा खासगी गाड्या, जीप आदी महागड्या सेवांचा आधार घ्यावा लागला. मात्र ग्रामीण भागात जेथे रिक्षा वा खासगी गाड्या उपलब्ध नव्हत्या तेथील लोकांचे हाल झाले. सुदैवाने सुटीमुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना थेट फटका बसला नाही. 

संपाचा तिढा संपुष्टात येत नसतानाच कर्मचाऱ्यांमध्येही कमी वेतनाविषयी कमालीची नाराजी आहे. बुधवारी संपाची तीव्रता आणखीनच वाढली असून, दिवसभरात राज्यात दररोजच्या 57 हजार फेऱ्यांपैकी केवळ सात बसगाड्या धावल्या. या संपामुळे एसटीचे सुमारे 44 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एसटीच्या भरवशावर आगाऊ आरक्षण केलेल्यांचे आजही हाल झाले. अशातच अनेक खासगी बस वाहतूकदारांनी दिवाळीत दर वाढविल्याने प्रवाशांना फटका बसला. 

चर्चा सुरूच 
संप मिटविण्यासाठी सकाळपासूनच मुंबई सेंट्रल मुख्यालयात कृती समितीचे पदाधिकारी आणि प्रशासनातर्फे चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, कृती समितीचे नेते संदीप शिंदे, हनुमंत ताटे आदींचा समावेश होता. सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत अनेक बैठका झाल्या तरी त्यातून मार्ग निघाला नाही. 

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी! 
एसटीने कर्मचाऱ्यांना 2,500 रुपयांचा बोनस जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरही त्याची खिल्ली उडविण्यात आली. इतकी रक्कम ठेवायची कुठे इथपासून त्यावर कॉमेंट्‌स करण्यात आल्या. 

सातव्या आयोगाची समस्या 
सातवा वेतन आयोग लागू केल्यास सहा हजार 200 कोटी रुपयांचा भार पडू शकतो; पण एसटीचे उत्पन्नच सात हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याने एवढा पैसा आणायचा कोठून, हा मुख्य प्रश्‍न प्रशासनापुढे आहे.