राणेंमुळे विस्तार रखडला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार तूर्त रखडला आहे. विस्तार लांबणीवर पडण्यामागे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समावेशाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार तूर्त रखडला आहे. विस्तार लांबणीवर पडण्यामागे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समावेशाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

नारायण राणे यांना काँग्रेसमधून बाहेर पडून थेट प्रवेश देण्याचे भाजपच्या श्रेष्ठीने नाकारल्याने राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष काढावा लागला. यानंतर राणे यांचा मंत्रिमंडळ विस्तारात निश्‍चित समावेश केला जाणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्‍चित असल्याचे जाहीर केले. यामुळे सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने राणे यांच्या प्रवेशावरून भाजपला लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. राणे जर मंत्रिमंडळात आले तर शिवसेनेला ते सोयीचे ठरणार नाही. यामुळे भाजप आणि शिवसेनेत सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. भाजप-शिवसेना युती सरकारला ३१ ऑक्‍टोबरला तीन वर्षे पूर्ण झाली. यानंतर केवळ वर्ष-दीड वर्षाचा कालावधी उरणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास त्यास सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन वर्षांच्या कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट करणे योग्य असल्याचे मानले जाते. असे असताना राणे यांच्या सहभागावरून यापुढेही शिवसेना आणि भाजपत खटके उडणार असल्याचे बोलले जाते. 

फडणवीस यांनी विस्तार निश्‍चितपणे होणार असल्याचे सांगितले असले तरी, इतक्‍यात तरी विस्तार होणार नाही. मात्र, विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात म्हणजे २६ तारखेपासून आठवडाभरात मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होण्याची दाट शक्‍यता आहे. 

शिवसेनेकडे लक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पक्ष म्हणून राणे यांना भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिल्यावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार की राणे यांच्याबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री सहभागी होणार, हा चर्चेचा विषय राहणार आहे.