देशात महाराष्ट्रच नंबर वन!

देशात महाराष्ट्रच नंबर वन!

मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, बाबा कल्याणी, आनंद महिंद्रा, तसेच बॅंकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. संपन्न महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा, सर्वांना माझा नमस्कार, असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली.

मोदी म्हणाले, ‘‘देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यापैकी तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था तयार करण्याची क्षमता एकट्या महाराष्ट्राची आहे. देशातील सर्व राज्यांची आपापसांमध्ये अनेक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. याआधी ईशान्य भारतातील ‘ॲडव्हांटेज आसाम’ हा चांगला कार्यक्रम झाला. आता महाराष्ट्राला शुभेच्छा.’’

‘‘देशात काही वर्षांत जगभरातून जेवढी परकीय गुंतवणूक आली त्यापैकी तब्बल ५१ टक्‍के म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात फडणवीस सरकारला यश आले. फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात चार लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी आज प्रत्यक्षात दोन लाख कोटींच्या उद्योगांची उभारणी सुरू आहे. आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे जगातील अनेक राष्ट्रांनी स्वागत केले आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडोर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पामुळे भविष्यात मोठा बदल होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर येथे ३५० किलोमीटर मेट्रोचे जाळे तयार होत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे तर राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत आमूलाग्र बदल घडणार आहे. या प्रकल्पामुळे कृषी व अन्य क्षेत्रांत विशेष विकास होणार आहे. महाराष्ट्रात ७०० किमी सुपर एक्‍स्प्रेस हायवेच्या आजूबाजूला तयार होणाऱ्या स्मार्ट सिटीसाठी २४ नवीन रस्ते तयार होणार आहेत. त्यामुळे २० ते २५ लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राने थ्री ट्रिलीयन डॉलरचा विकास साधण्याचा संकल्प केला आहे,’’ असेही मोदी यांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत कोणतेही उद्दिष्ट ठेवणे कठीण नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे लक्ष्य पूर्ण करेल, असा मला विश्‍वास आहे. देशाचा विकास राज्यांच्या विकासावर अवलंबून असतो. महाराष्ट्राचा विकास वाढत असल्याचे येथील प्रगतीवरून दिसून येते.  

देशातील आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. मला आठवते, काही वर्षांपूर्वी भारत पहिल्यांदा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये आला; मात्र त्यानंतर देशात वेगळेच वातावरण तयार होऊन प्रगती खुंटली. असे असताना तीन वर्षांत आम्ही पाच ट्रिलीयन डॉलरचा टप्पा गाठत आहोत. अनेक देशांना हा विश्‍वास वाटत आहे. हा विश्‍वास निर्माण होण्यासाठी आम्ही नवीन व्हिजन तयार केली. गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण जाणीवपूर्वक तयार केले. लहान समस्याही सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत. नवीन देश तयार करण्यासाठी आम्ही पारदर्शक कारभाराचे वातावरण तयार केले आहे, असेही मोदी म्हणाले.  

सरकारी पातळीवरील सर्व नियम व कायदे आम्ही सुटसुटीत करत आहेत. कालबाह्य झालेले कायदेही रद्द करीत आहोत. तीन वर्षांत केंद्र सरकारने १४०० कायदे रद्द केले. नवीन कायदेही अधिक सोपे-सुटसुटीत करीत आहोत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही देशातील गरिबांपर्यंत पोचत आहोत. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे सरकारचे नियोजन आहे. २०१९ पर्यंत सर्वांना वीज देण्यासाठी आम्ही केव्हाच प्रयत्न सुरू केले आहेत. उज्ज्वला योजनेतून २५ कोटींपैकी आठ कोटी कुटुंबांना मोफत गॅस देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com