"राष्ट्रवादी' माध्यमांवर फौजदारी दाखल करणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक झाल्यानंतर काही वाहिन्यांनी जाणूनबुजून इक्‍बाल कासकरचा संबंध राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांशी असल्याचे बेजबाबदार वृत्त दिल्याची गंभीर दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. वृत्तवाहिन्यांनी "राष्ट्रवादी'चे नाव घेत पक्षाच्या नेत्यांचे चेहरे दाखवून बदनामी केल्याचा आक्षेप घेत असे तथ्यहीन वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना कायदेशीर नोटीस पाठवून प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिला. 

ज्या वृत्तवाहिन्या याबाबत चूक लक्षात घेऊन माफी मागणार नाहीत, त्यांच्याविरोधात खटला दाखल करू, असे नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, की इक्‍बालच्या अटकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अटकेचा सर्व तपशील दिला होता. त्यामध्ये परमवीर सिंह यांनी कुठेही राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा पक्षातील नेत्यांची नावे घेतलेली नव्हती. पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकातही "राष्ट्रवादी' अथवा पक्षाच्या कथित नेत्यांचा उल्लेख नाही. तरीही काही वाहिन्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन बेजबाबदारपणे बातमी चालवली. 

तब्बल 40 वाहिन्यांचे व्हिडिओ राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळवले आहेत. ज्या वाहिन्यांनी जाणूनबुजून बातमी चालवली, त्यांना नोटीस पाठवण्यात येईल. वाहिन्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तयारी पक्षातर्फे केली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.