राज्यात पावसाचे पुनरागमन; विदर्भात अर्धा अनुशेष भरला

rain
rain

पुणे, नागपूर : गेले सुमारे महिनाभर रुसलेल्या पावसाने राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पुनरागमन केले. आजही (रविवार) पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विदर्भात पावसाने शुक्रवारी रात्री धुवाधार बॅटिंग केली. सुमारे तीन तास पाऊस कोसळल्याने यंदाच्या हंगामातील अर्धा अनुशेष पावसाने एकाच दिवशी भरून काढला. नागपूर विभागात चोवीस तासांत सरासरी 52.51 मिलिमीटर पाऊस कोसळला. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत शनिवारी पावसाने हजेरी लावली. तसेच, मुंबई व ठाण्यातही पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. 

नागपूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांत शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाली. नागपूर शहरात धुवाधार पावसाने दाणादाण उडाली. नाग नदी व पिवळी नदी ओसंडून वाहत होती. रस्तेही जलमय झाले होते. तीन तास पावसाने शहराला ठप्प केले होते. रात्री साडेआठपासून साडेबारापर्यंत पाऊस कोसळत होता. यामुळे नागपूरचे जलसंकट थोडे दिवस टळणार आहे. 

जिल्ह्यातील उमरेड तालुक्‍यात सर्वाधिक 151.20 मिलिमीटर पाऊस झाला. कामठी तालुक्‍यात 142.60 मि.मी., नागपूर ग्रामीण 141.90 मि.मी., मौदा तालुक्‍यात 137.00 मि.मी., पारशिवनी तालुक्‍यात 117.30 मि.मी. पावसाची नोंद झाली. 
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यात 104.20 मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्‍यात 117.40 मि.मी., गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यात 71.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

नागपूर विभागात एक जून ते 19 ऑगस्ट या दरम्यान सरासरी 555.97 मि.मी. पाऊस पडला. यापैकी शुक्रवारी रात्री नागपूर 99.99, गडचिरोली 39.05, गोंदिया 29.13, भंडारा 66.80, चंद्रपूर 37.08, तर वर्धा येथे 43.00 मिलिमीटर पाऊस झाला. 

ठाण्याला पावसाने झोडपले 
ठाणे : ठाणे शहराला आज मुसळधार पावसाने झोडपले. शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यासह काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. दिवसभरात सुमारे 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात सखल भागात पाणी तुंबल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरिकांची पाण्यातून वाट काढताना चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतल्यानंतर कोसळलेल्या पावसाने श्रावणातील अखेर चांगलीच गाजवली. पोखरण रोड नं. 2 येथे मोठे दोन वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही. मुंब्रा येथील सिमला पार्कनजीकच्या कौसा तलावात रफिक सारंग (वय 57) यांचा मृतदेह आढळला. 

नांदेड, हिंगोलीत पाऊस 
औरंगाबाद : सुमारे दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत शनिवारी सकाळपासून पावसाला सुरवात झाली. सायंकाळपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे हजारो एकरवरील पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात किल्लेधारूर, माजलगावसह इतर तालुक्‍यांत बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातही सर्वदूर भीजपाऊस आहे. उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्‍यांसह जिल्ह्यातील इतर भागांत अर्धा तास पाऊस झाला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

कोयना धरण परिसरात पावसाची हजेरी 
सातारा : सलग 19 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोयना धरण परिसरासह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पावसास सुरवात झाली. ऐन फुलोऱ्यात असणाऱ्या खरीप पिकांना यामुळे जिवदान मिळाले आहे. कोयना धरणात 89 टीएमसीच्या आसपास पाणीसाठा आहे. हे धरण भरण्यासाठी अद्याप 15 टीएमसी पाण्याची गरज आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे 21 जुलै रोजी पायथा वीजगृहातून व 28 जुलैला सहा वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. एक ऑगस्टला दरवाजातून व दुसऱ्या दिवशी पायथा वीजगृहातून पाणी सोडणे बंद केले गेले. जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, तुरळक स्वरूपात पाऊस झाला. 

सोलापुरात पावसाची हजेरी 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर या तालुक्‍यांसह विविध भागांत दुपारी चारपासून पावसाने हजेरी लावली. सोलापूर शहर व परिसरातही सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम सुरू झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com