दखलपात्र गुन्ह्यांच्या तपासाचे पोलिसांना निर्देश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या सर्व दखलपात्र गुन्ह्यांचा तपास करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी हमी मंगळवारी (ता. 7) राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. 

मुंबई - पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या सर्व दखलपात्र गुन्ह्यांचा तपास करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी हमी मंगळवारी (ता. 7) राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. 

प्रेम प्रकरणांतून महिला बलात्काराच्या तक्रारी करतात. या बाबतीत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकरणांचे गुन्हे दाखल करताना पोलिसांनी निश्‍चित निकष आखावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रेम प्रकरणांमध्ये लग्नाचे आश्‍वासन देऊन सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्यास अशा तक्रारींची नोंद बलात्कार म्हणून करता येणार नाही. मात्र, पीडित महिलेने तक्रार नोंदविण्याची इच्छा व्यक्त केल्यास ती दाखल करून घेणे पोलिसांना बंधनकारक आहे. तसेच शारीरिक संबंध सहमतीने झाले आहेत का, याचा तपासही पोलिसांनी करायला हवा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक प्रेम प्रकरणांच्या फिर्यादींमध्ये तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुषांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे तक्रार करण्यात आल्याचे आढळले आहे. कालांतराने त्यांच्यामध्ये समेटही होत असतो; मात्र यामध्ये अकारण पोलिस आणि अन्य यंत्रणांचा वेळ जातो. अनेकदा रागाच्या भरात केलेल्या तक्रारीमुळे आरोपीची प्रतिमा मलीन होते. हे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने अशा प्रकरणांची तक्रार नोंदविण्याऐवजी प्रारंभी तपास करणे गरजेचे आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.