मराठा क्रांती मोर्चा म्हणजे दाबून ठेवलेल्या असंतोषाचा उद्रेक

मानस पगार
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

ग्रामीण मराठा हा नेहमीच खलनायक, रगेल, रंगेल, भ्रष्टाचारी, शोषक दाखवण्याची परंपरा कृष्णधवल चित्रपट 'सामना' ते अगदी कालपरवा येऊन गेलेल्या 'सैराट'पर्यंत जोपासली जात आहे. प्रत्यक्षात शेतीप्रधान व्यवस्थेवर जागतिकीकरणानंतर आलेल्या संकटाचा सर्वाधिक बळी हाच समाज ठरला आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ आता नऊ ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाबद्दल भाष्य करताहेत तरूण लेखक मानस पगार.

कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा मोर्चे सुरु झाले. लाखांच्या या मुक मोर्चांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक विश्व व्यापले. मुकपणे प्रश्नांना वाचा फोडण्याचा संघटित प्रयत्न केला. कोपर्डीची घटना हा दशकानूदशके दबलेल्या फरफट झालेल्या कृषक समाजाचा उत्थान बिंदू ठरला.

मराठा हा प्रामुख्याने कृषक समाज. म्हणजेच उत्पादक समाज. काळाच्या ओघात दुष्काळ वगैरे निसर्गचक्रात, जागतिकीकरणात सरकारच्या शेतमालाचे भाव नियंत्रित करण्याच्या अट्टहासामुळे म्हणा किंवा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींच्या योग्य अंनलबजावणी अभावी म्हणा सातत्याने ही उत्पादक जात भरडून निघत आली आहे. त्यात सिलींग अॅक्ट, वाटणीमुळे आकसले जाणारे क्षेत्र यामुळे गावगाड्यात महत्त्वाची भुमिका बजावणारी ही उत्पादक जात आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आली. उत्पादकांवर आधारित असलेले इतर बिगर कृषक समाज यांनी शहराचा रस्ता धरण्यास सुरुवात केली. शहरात रोजंदारी, नोकऱ्या करुन दररोज माफक पण ताजा पैसा मिळत गेल्याने, शिवाय नागरीसुविधांचा वगैरे लाभ प्राप्त झाल्याने जीवनमान सुधारले. राहणीमानाचा दर्जा उंचावला. शिक्षण, आरोग्य सुविधांची जोड मिळून शहरी, निमशहरी भागात, जिल्ह्याच्या ठिकाणी विकसित अर्थाने विस्थापित होत पुढे प्रस्थापित झाला. पण कृषक समाजात ही प्रक्रिया तितक्या वेगाने होऊ न शकल्याने आर्थिक आघाडीवर तो पिचत गेला. त्याचे पर्यावसान भीषण संख्येने शेतकऱ्यांच्या आत्महत्यात होत गेले. बेगडी सामाजिक प्रतिष्ठांच्या कल्पना, रुढी परंपरा, सावकारांचे शोषण यामुळे दरिद्र्यात पिचला जावून मराठवाडा, विदर्भात या समाजाची अधोगती सुरु झाली.

हे प्रश्न चव्हाट्यावर येण्याऐवजी आणण्याऐवजी माध्यमांनी, अभिजन वर्गाने व पुढारलेल्या दलित वर्गाने अभेद्य युती करुन प्रतिष्ठित पाटलांचे, शोषक सरंजामदारांचे 60 च्या दशकातील कृष्णधवल चित्र आणि लेखांत रंग भरण्यात या समाजातील प्रतिगामी वर्गाचा अहंकार कुरवाळण्यात मोठी भुमिका बजावली. ग्रामीण मराठा हा नेहमीच खलनायक, रगेल, रंगेल, भ्रष्टाचारी, शोषक दाखवण्याची परंपरा कृष्णधवल चित्रपट 'सामना' ते अगदी कालपरवा येऊन गेलेल्या 'सैराट'पर्यंत जोपासली जात आहे. सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचा आव आणत नंतर निर्माण होणाऱ्या सामाजिक तणावावर पोट भरणाऱ्या वर्गाची वृत्ती आणि हेतुबाबत शंका घेण्यास पुरेसा वाव ही माध्यमे आणि कलाकृती दाखवून देतात. मारुती कांबळेचं काय झालं? हा प्रश्न विचारणाऱयांची जीभ 'हिंदुराव पाटलाच्या मुलाचे काय झाले' हा प्रश्न विचारताना जड होते. यातून जातीयवादी खेळी काळाच्या ओघात आणखी रंगत गेली. मराठा म्हणजे हीच प्रतिमा हा गैरसमज दृढ होत गेला. मुठभर मराठा नेतृत्त्वाकडे बोट दाखवून समस्त समाजाला 'सत्ताधारी जमात' म्हणून अभिजन परंपरेत रमलेल्या अन् जन्माने बहुजन असणाऱ्या विद्वानांनी मोठी भुमिका बजावली. त्यामुळे प्रश्न आणखी कुजत राहिले आणि ही आभासी प्रतिमा मारक ठरत गेली. 

कोपर्डीची घटना हा निव्वळ उद्रेक होता. दशकानुदशके दाबून ठेवलेल्या असंतोषाचा. मराठा मुक मोर्चांमधून ज्या मागण्या पुढे आल्या त्यातून ते स्पष्ट झाले. आरक्षण, शेतमालाला हमीभाव इत्यादी मागण्यांसाठीची पार्श्वभूमी तिथं आहे. सरकारने हा उद्रेक शमविण्यासाठी आश्वासनांची खैरात तर केली; पण प्रत्यक्षात वाट्याला फार काही ठोस आलेच नाही. संघटीत समाजाचे प्रबोधन सोपे जाते म्हणून कित्येक परिवर्तनवादी संघटना पुढे आल्या. त्यातून शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाचा फुटत क्रांती मोर्चाचे स्वरुप व्यापक होत त्यात सर्व शेतकरी बांधव संघटीत होऊन शेतकरी संपावर गेला. एका ठिकाणी कावेबाजपणे शमविलेला उद्रेक असा या रुपाने उफाळून येत कर्जमाफीचा अधिकृत घोषणा ऐकूनच शांत झाला. हे क्रांती मोर्चाचे, त्यात सहभागी झालेल्या परिवर्तनवादी संघटना यांचेच यश आहे.

मोर्चातून फार काही साध्य झाले नाही असे वाटत असताना (असे वाटावे हा अपप्रचार केला जात असताना) त्याचे दुरगामी परिणाम घडून येत आहेत. सध्या त्याचे स्वरूप सुक्ष्म असले तरी येणाऱ्या काळात ते नक्कीच व्यापक होऊ शकेल. आता वर्ष लोटले जात असतानाही बऱ्यापैकी धग या विषयात असल्याने 9 ऑगस्टला पुन्हा मोर्चा निघत आहे. व्यापक कृती कार्यक्रम न दिल्यास ही धग उत्तरोत्तर कमी होऊ शकते; पण त्यानिमीत्ताने एकत्र आलेला समाज आज आत्मचिंतन करतोय, प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी संघटीत होऊन सनदशीर मार्गाने संघर्ष करतोय हे काही कमी नाही.