मराठा मोर्चावर सरकारचे "चिंतन'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

मुंबई - राज्यभरात मराठा समाजातर्फे काढण्यात येत असलेल्या महामोर्चाची अखेर सरकार पातळीवर दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांसोबत मंगळवारी सुमारे तीन तास "चिंतन‘ बैठक घेतली.

मुंबई - राज्यभरात मराठा समाजातर्फे काढण्यात येत असलेल्या महामोर्चाची अखेर सरकार पातळीवर दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांसोबत मंगळवारी सुमारे तीन तास "चिंतन‘ बैठक घेतली.

राज्यात मराठा समाजामध्ये असलेला असंतोष ते रस्त्यावर उतरून व्यक्‍त करीत असताना, सरकार म्हणून कोणती भूमिका घ्यायला हवी यावर सुमारे 40 ते 42 प्रमुख प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी सखोल चर्चा केली. यामध्ये मराठा आरक्षण, "ऍट्रॉसिटी‘चा गैरवापर आणि इतर सामाजिक व आर्थिक समस्यांचा आढावा घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज मूक मोर्चे काढत असल्याने अनेकांनी अभिनंदनही केले. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अगोदर समाजाच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार केला नाही तर त्याचा फटकाही बसू शकतो, अशी भीती या वेळी व्यक्‍त करण्यात आली.

यावर मुख्यमंत्र्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या मनात कोणतीही नकारात्मक भावना नाही. न्यायालयाने हे आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारने त्यावर अपिल केले आहे. मराठा समाजाच्या आर्थिक मागास परिस्थितीचे सर्व पुरावे जमा करण्याची तयारी सुरू आहे. न्यायालयात आरक्षणाची बाजू भक्‍कमपणे मांडली जाईल. पण सध्या सुरू असलेल्या मोर्चातून सरकारविरोधी भावना निर्माण होणार नाही याची दक्षता तातडीने घ्यायला हवी, अशी भूमिका उपस्थित नेत्यांनी मांडल्याचे समजते.

दरम्यान, "ऍट्रॉसिटी‘च्या गैरवापराबाबत मराठा समाजात सर्वाधिक रोष असल्याचे अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. सध्या मूक मोर्चे निघत असले तरी या संपूर्ण समस्येबाबत सरकारने वेळीच सकारात्मक भूमिका घेऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचा सूर बैठकीत होता.

भाजप व शिवसेनेचे काही मराठा आमदार, स्थानिक पदाधिकारी यांना बैठकीला बोलावण्यात आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल. मराठा समाजाने संयमाने मूक मोर्चे काढल्याचे कौतुक आहे. या मोर्चामागची भावना मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. 

रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप 

Web Title: Maratha Front government "thought"