महिलांसाठी पूरक वातावरणाची गरज

महिलांसाठी पूरक वातावरणाची गरज

देशाच्या उभारणीत महिला खूप मोठे योगदान देऊ शकतात. त्यासाठी त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर मोठे प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे मत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मंगळवारी झालेल्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

उद्योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांनी स्वत:ला कोणत्याही पातळीवर कमी न समजता पूर्ण आत्मविश्‍वासाने आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करत वाटचाल करणे गरजेचे आहे. महिलांना काम करण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याची गरज आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले.

या चर्चासत्रात कॅनडाच्या लघुउद्योग आणि पर्यटनमंत्री बर्दीश छग्गर, भारतातील स्विडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन, मेट्रोपॉलीस हेल्थ केअरच्या व्यवस्थापकीय संचालिका अमीरा शाह, मल्टिप्लेस अल्टर्नेट सेट मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका रेणुका रामनाथ, इस्त्रोच्या उपप्रकल्प संचालिका मीनल संपथ, ‘हे दीदी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय, मेझॉन कंपनीच्या संचालिका अर्चना व्होरा सहभागी झाल्या होत्या.

छग्गर म्हणाल्या, ‘आपण समान आहोत, ही मानसिकता ठेवून महिलांनी आपापल्या क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. न्यूनगंड न बाळगता वाटचाल केल्यास महिलांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे अशक्‍य नाही.’ सारा लार्सन म्हणाल्या, ‘महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणावा लागेल. महिलांना उद्योजक किंवा एखाद्या संस्थेच्या प्रमुख किंवा नेत्या बनता यावे, यासाठी हा बदल गरजेचा आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच हे होऊ शकेल. महिलांसाठी विविध क्षेत्राच्या प्रशिक्षणावर भर देणेही गरजेचे आहे.’

मीनल संपथ यांनी या वेळी ‘इस्त्रो’च्या मंगळयान मोहिमेची माहिती दिली. सुमारे ४० महिला वैज्ञानिकांनी या मोहिमेच्या यशात योगदान दिले, असे त्यांनी सांगितले.

रेवती रॉय यांनी सुरवातीला टॅक्‍सीचालक म्हणून काम केले होते. टॅक्‍सी चालवणे सोडून घर सांभाळण्याचा सल्ला अनेकांनी दिला. महिला टॅक्‍सी चालवू शकत नाहीत, हा मोठा गैरसमज असून तो दूर करण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले, असे रॉय यांनी सांगितले.

करिअर आणि कुटुंब यांची सांगड घालताना महिलांची कसरत होते. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला कमी न समजता वाटचाल करावी. कामावरची निष्ठा, अखंड मेहनत, विश्‍वासाच्या जोरावर महिला कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळवू शकते, असे त्या म्हणाल्या. महिलांसाठी उद्योजकताविषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. 
- रेणुका रामनाथ,  व्यवस्थापकीय संचालिका, मल्टिप्लेस अल्टर्नेट सेट मॅनेजमेंट

कंपनी उद्योजिकांना रोल मॉडेल म्हणून समोर आणावे!
महिलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. ‘युनेस्को’च्या सर्वेक्षणानुसार भारतात केवळ १४ टक्के महिला संशोधक आहेत. जागतिक पातळीवर हे प्रमाण २८.४ टक्के आहे. महिलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहभाग वाढणे गरजेचे आहे. यशस्वी महिला उद्योजकांना रोल मॉडेल म्हणून शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मुली आणि महिलांसमोर आणणे गरजेचे आहे, असे मत मीनल संपथ यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com