इलेक्‍ट्रिक वाहतूक व्यवस्था राज्यात उभारणार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदूषणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून, यापुढील काळात शंभर टक्के इलेक्‍ट्रिक मोबिलिटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून, भविष्यात सर्व बसेस या इलेक्‍ट्रिकवर चालविल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. "एमएमआरडीए'च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने चालविण्यात येणाऱ्या 25 हायब्रीड बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृहात झाला. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते प्रमुख पाहुणे होते. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे आदी या वेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेत मुंबई व "एमएमआरडीए'चा समावेश केल्याबद्दल केंद्र सरकार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे आभार मानून फडणवीस म्हणाले, ""कितीही रस्ते बांधले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाल्याशिवाय ही कोंडी कमी होणार नाही. सार्वजनिक वाहतूक हाच यावरचा उपाय आहे.

भविष्यात इलेक्‍ट्रिक वाहतूक व्यवस्थेकडे जावे लागणार आहे. पुढील काळात सर्व बस या संपूर्ण इलेट्रिक करण्यात येतील. त्यासाठीचे चार्जिंग धोरण तयार केले आहे.

बेस्टसाठी आणखी 80 इलेक्‍ट्रिक बस
अनंत गीते म्हणाले, 'केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून "एमएमआरडीए'ला या बससाठी अनुदान देण्यात आले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या या नावीन्यपूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी देशातून सर्व प्रथम राज्य सरकार व "एमएमआरडीए'ने तयारी दर्शविली. कोणत्याही नव्या कल्पनांना व उपक्रमांना बळ देण्याचे काम महाराष्ट्राने व मुंबईने नेहमीच केले आहे.'' "बेस्ट'ला यापूर्वी 40 इलेक्‍ट्रिक बस दिल्या आहेत. लवकरच 80 बस देण्यात येणार असल्याचेही गीते यांनी या वेळी सांगितले.

हायब्रीड बसची वैशिष्ट्ये
- एकूण आसन क्षमता 31
- 25 बस चालविणाऱ्या जाणार
- "मेक इन इंडिया'अंतर्गत उत्पादित पहिली बस
- हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर 30 टक्के बचत
- इतर बसच्या तुलनेत 28.24 टक्के इंधन बचत
- संपूर्ण वातानुकूलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सुविधा
- आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन, व्हिलचेअरसाठी उताराची व्यवस्था
- गिअरलेस व क्‍लचलेस कार्यपद्धती
- जीपीआरएस यंत्रणा

Web Title: marathi news maharashtra news electric transport hybrid bus devendra fadnavis