डागाळलेल्या मंत्र्यासह कारभार हाकणे मुख्यमंत्र्यांना कठीण 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 ऑगस्ट 2017

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे भविष्यात डागाळलेल्या मंत्र्यांसह कारभार हाकणे मुख्यमंत्री फडणवीस यांना कठीण जाणार आहे.

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे भविष्यात डागाळलेल्या मंत्र्यांसह कारभार हाकणे मुख्यमंत्री फडणवीस यांना कठीण जाणार आहे.

परिणामी, या मंत्र्यांबाबत योग्य तो निर्णय घेत पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याची पावती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार आहे. नाही तर विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस लवकरच काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवत मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. केंद्रातील विस्तारानंतर राज्यातील विस्तार अपेक्षित आहे, असे सांगण्यत येते. 

मंत्रिमंडळातील काही सदस्यांवर यापूर्वी विविध कारणांवरून आरोप झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आरोप झाल्यावर राजीनामा दिला, असे सांगण्यात येते. मात्र महेता आणि देसाई या दोन मंत्र्यांवर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घेत चौकशी करण्याची घोषणा अखेर करावी लागली. या दोन मंत्र्यांचे भवितव्य टांगणीला लागले असताना मंत्रिमंडळ विस्तार अपरिहार्य ठरला आहे. खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात यायचे आहे. तर भाजपमधील काही इच्छुकांनी वर्णी लावण्यासाठी कंबर कसली आहे. 

याबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी केवळ दोन-सव्वादोन वर्षांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणे, निवडणूक नरजेसमोर ठेवत प्रादेशिक समतोल साधणे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांना खांदेपालट, विस्तार करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. हा विस्तार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्‍यता आहे.