पावसामुळे कमी भारनियमन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मुंबई : राज्यभरात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. विजेची मागणी कमी झाल्याने भारनियमन कमी होणार आहे. आज दिवसभरात 500 मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. महावितरणच्या ग्राहक श्रेणीतील डी, ई आणि एफ या ग्राहक श्रेणीतील ग्राहकांसाठी आज भारनियमन झाले नाही. 

मुंबई : राज्यभरात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. विजेची मागणी कमी झाल्याने भारनियमन कमी होणार आहे. आज दिवसभरात 500 मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. महावितरणच्या ग्राहक श्रेणीतील डी, ई आणि एफ या ग्राहक श्रेणीतील ग्राहकांसाठी आज भारनियमन झाले नाही. 

शनिवारी राज्यात 14 हजार मेगावॉट विजेची मागणी होती, तर 13,500 मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. महावितरणने विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी खुल्या बाजारातून अल्प मुदतीसाठी 395 मेगावॉट वीज खरेदी केली. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे व शनिवारी असलेल्या बंद आस्थापनांमुळे विजेची मागणी कमी होती. 

दरम्यान, रतन इंडियाकडून महावितरणने 1200 मेगावॉट विजेची खरेदी केली आहे.  कोळसा खाणीच्या उत्पादनाच्या ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे कोळसा उत्पादन प्रक्रियेत घट झाली आहे. ओरिसा आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी खाण क्षेत्रात साचलेल्या पाण्यामुळे उत्पादनात अडचणी येत होत्या. परिणामी कोळसा उपलब्धततेवरही त्याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या कोळशाच्या रेक्‍समध्येही त्यामुळे घट झाली आहे. पावसाच्या कारणामुळे दहा रेक्‍स कमी कोळसा महानिर्मितीला येत आहे. सध्या राज्यातील जवळपास सर्वच वीज केंद्रांवर तीन दिवस पुरेल इतका कोळसा आहे. नियमानुसार किमान पंधरा दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असणे अपेक्षित आहे. 

कृषी ग्राहकांच्या वेळापत्रकात बदल 
कोळशामुळे वीजनिर्मिती केंद्राच्या ठिकाणी निर्माण झालेली अडचण पाहता कृषी ग्राहकांच्या विजेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेत 10 तासांएवजी 8 तास वीज देण्यात येत आहे. राज्यात कृषीपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या आहेत, तसेच जिथे सिंगल फेजिंगची योजना आहे अशा ठिकाणी चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येत आहे. दिवसा आठ तास तसेच रात्री आठ तास अशा दोन टप्प्यात वीजपुरवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्यानंतर रात्री 10 तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.