अभिनंदन मुंबईकर! आपण देशातील सर्वात महागडे पेट्रोल खरेदी करत आहात!!

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पेट्रोलचे दर सतत चढे राहण्याला कर आणि अधिभार मुख्यतः कारणीभूत आहेत. भारतात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलचा सरासरी दर 69 रूपये 43 पैसे होता. त्यामध्ये करांचा वाटा तब्बल पन्नास टक्क्यांवर आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या विविध अधिभारांमुळे मुंबईतील पेट्रोलचे प्रती लिटर दर देशात सर्वोच्च क्रमांकावर राहिले आहेत. सलग सहाव्या महिन्यातही मुंबईकर पेट्रोलसाठी देशातील अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक पैसे मोजत आहेत. 

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात पेट्रोलचा वापर राज्य सरकार विविध कारणांनी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी करत आहे. दुष्काळापासून ते महामार्गांवर पाचशे मीटरपर्यंत दारूबंदीच्या आदेशापर्यंत, सर्व बाबतीत सरकारने नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोलवर अधिभार लागू केले आहेत. परिणामी, मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वांत महागडे झालेले आहेत. 

मे 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील अधिभार दोन रूपयांनी वाढवला. महामार्गांवरील पाचशे मीटर अंतरापर्यंतचे बार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे अबकारी कराचे नुकसान होणार होते. ते भरून काढण्यासाठी हा प्रकार झाला. त्या आधी एप्रिलमध्ये मूल्यवर्धित कर (व्हॅल्यू अॅडेड टॅक्स - VAT) वाढवला. त्यामुळे मुंबई महानगरातील पेट्रोलचे दर 2 रूपये प्रती लिटरने वाढले. 

पेट्रोलचे दर सतत चढे राहण्याला कर आणि अधिभार मुख्यतः कारणीभूत आहेत. भारतात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलचा सरासरी दर 69 रूपये 43 पैसे होता. त्यामध्ये करांचा वाटा तब्बल पन्नास टक्क्यांवर आहे. तेल उत्पादक कंपन्या तेल शुद्धीकरण कारखान्यांना 26.65 रूपये प्रती लिटर दराने तेल दोन सप्टेंबरला पुरवत होत्या. अबकारी आणि मुल्यवर्धीत कर वगळता तेल पुरवठादार कंपन्यांना शुद्धीकरण कारखाने 29.96 रूपये दराने तेल विकतात. त्यावर 21.48 रूपये अबकारी कर लागतो. त्यावर पेट्रोल पंप डिलरचे 3.24 रूपये प्रती लिटर कमिशन वाढते. मग त्यामध्ये मूल्यवर्धित कर 14.76 रूपये वाढतो आणि देशातील पेट्रोलचा किरकोळ बाजारातील दर 69 रूपये 43 पैसे होतो. 

या करांवर महाराष्ट्र सरकार आणखी अधिभार लावते. सध्याच्या दरानुसार प्रती लिटर पेट्रोलमागे महाराष्ट्र सरकार 10 ते 11 रूपये अधिभार लावत आहे. परिणामी, महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई महानगर परिसरातील पेट्रोलचे दर तब्बल 79 रूपये 63 पैशांपर्यंत पोहोचले आहेत. 

पेट्रोल 'जीएसटी'मध्ये आणण्याची मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केली आहे खरी; मात्र कोणतेही राज्य हे मान्य करेल, अशी स्थिती नाही. 24 ते 27 टक्के प्रती लिटर कर मिळवून देणारी आणि कोणताही अधिभार कधीही लावता येणारी पेट्रोलसारखी सोन्याची कोंबडी देशातील राज्य सरकारे 'जीएसटी'मध्ये आणण्याची शक्यता दिसत नाही. 

देशातील विविध राज्यांमधील 20 सप्टेंबरचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

राज्य शहर पेट्रोल/लिटर डिझेल/लिटर
महाराष्ट्र मुंबई 79.63 62.45
दिल्ली नवी दिल्ली 70.52 65.79
पश्चिम बंगाल कोलकता 73.26 61.45
तमिळनाडू चेन्नई 73.10 61.92
आगरतळा त्रिपुरा 66.42 56.97
एेझवाल मिझोराम 66.55 56.29
अंबाला हरियाणा 70.07 58.69
बंगळुरू कर्नाटक 71.63 58.90
भोपाळ मध्य प्रदेश 76.93 65.25
गुवाहाटी आसाम 72.48 61.29
गांधीनगर गुजरात 72.34 65.33
गंगटोक सिक्कीम 73.40 60.55
डेहराडून उत्तराखंड 73.10 61.39
चंदीगड चंदीगड 70.66 59.63
भुवनेश्वर ओडिशा 69.39 63.04
जम्मू जम्मू काश्मीर 72.18 59.81
जयपूर राजस्थान 73.16 62.86
इटानगर अरूणाचल प्रदेश 66.70 56.36
इंफाळ मणिपूर 68.68 57.02
हैदराबाद तेलंगणा 74.68 63.87
पुद्दुचेरी पुद्दुचेरी 69.46 60.79
पाटणा बिहार 74.85 62.46
पणजी गोवा 64.96 59.76
लखनौ उत्तर प्रदेश 72.60 59.85
कोहिमा नागालँड 68.98 57.24
तिरूअनंतपूरम केरळ 74.37 63.93
श्रीनगर जम्मू काश्मीर 74.85 62.02
शिमला हिमाचल प्रदेश 71.20 58.98
शिलाँग मेघालय 69.92 58.57
रांची झारखंड 71.76 62.18
रायपूर छत्तीसगड 71.03 63.56
फरीदाबाद हरियाणा 70.72 59.29
गुरूग्राम हरियाणा 70.48 59.07
नॉयडा उत्तर प्रदेश 72.65 59.88
गाझियाबाद उत्तर प्रदेश 72.54 59.77
अमरावती आंध्र प्रदेश 76.53 65.86
सिल्वासा दादरा, नगर हवेली 68.64 59.55

(वरील दर 20 सप्टेंबर 2017 रोजीचे आहेत)

अन्य देशातील सर्वसाधारण दर

देश पेट्रोल/प्रती लिटर डिझेल/प्रती लिटर
भारत 69.26 57.13
पाकिस्तान 42.14 46.93
श्रीलंका 53.47 39.69
नेपाळ 61.24 46.24
भुतान 62.21 56.05
बांगलादेश 69.91 51.05
मलेशिया 32.19 31.59
इंडोनेशिया 40.58 43.36

(वरील दर 1 सप्टेंबर 2017 रोजीचे आहेत)

Web Title: marathi news marathi websites Petrol Prices in India Indian Economy Mumbai News Maharashtra Petrol