दुष्काळावर मात करण्यासाठी पूलवजा बंधारे - नितीन गडकरी

दुष्काळावर मात करण्यासाठी पूलवजा बंधारे - नितीन गडकरी

मुंबई - दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर पूलवजा बंधारे बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भात 41, मराठवाड्यात 98, पुण्यात 11, नाशिकमध्ये 17 असे 167 पूलवजा बंधारे बांधण्यात येतील. त्यामुळे दुष्काळी भागांतील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. 

तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जल संवर्धनाबाबत आग्रह धरल्यामुळेच त्यांच्या काळात अमरावतीमध्ये पहिला पूल वजा बंधारा प्रकल्प उभा राहू शकला. अमरावतीमधील पाण्याचा प्रश्न सोडवणारा हा पूल म्हणजे जलसंवर्धन क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेली एक प्रकारे देणगी आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प उभारण्याचा विचार केला. अशाच प्रकारचे बंधारे आधी बांधले गेले असते तर दुष्काळात लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली नसती, असे मत गडकरी यांनी या वेळी व्यक्त केले. 

या प्रकल्पामुळे 50 हजार हेक्‍टर जमीन पाण्याखाली येणार आहे. बंधाऱ्यात सतत पाणी राहिल्यामुळे जलसंवर्धनाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. त्याचप्रमाणे आसपास क्षेत्रातही पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे गडकरी म्हणाले. 

केंद्रात महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना या राज्याचा अधिक विकास व्हावा म्हणून राज्यात पाच लाख कोटी रुपयांची कामे करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी राष्ट्रीय महामार्ग, जलस्रोत, नदीजोड, बंदरे विकास आदी कामांसाठी आत्तापर्यंत दोन लाख 80 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. वर्षभरात पाच लाख कोटी रुपयांहून अधिक रुपयांची कामे करण्याचा मानस आहे. 2014 पूर्वी राज्यात पाच हजार 700 किमीचे महामार्ग होते. आम्ही चार वर्षांत 16 हजार 636 किमी रस्ते वाढवले, अशी माहिती त्यांनी दिली. 

मिठीच्या दुरवस्थेबाबत चिंता 
मुंबईतील मिठी नदीच्या दुरावस्थेबद्दल गडकरी यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने या नदीच्या शुद्धीकरणासाठी काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com