'मार्ड'चे सामूहिक रजा आंदोलन मागे - गिरीश महाजन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - डॉक्‍टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेले सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. तसेच आंदोलन मागे न घेणाऱ्या डॉक्‍टरांचे सहा महिन्यांचे वेतन रोखणार असल्याचा इशाराही त्यांनी डॉक्‍टरांच्या "मार्ड' संघटनेला दिला.

मुंबई - डॉक्‍टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेले सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. तसेच आंदोलन मागे न घेणाऱ्या डॉक्‍टरांचे सहा महिन्यांचे वेतन रोखणार असल्याचा इशाराही त्यांनी डॉक्‍टरांच्या "मार्ड' संघटनेला दिला.

गेले तीन दिवस डॉक्‍टरांच्या सामूहिक रजेच्या आंदोलनामुळे विविध शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर योग्य ते उपचार होत नव्हते. त्यामुळे अखेर याप्रश्‍नी मुंबई उच्च न्यायलयाने हस्तक्षेप केल्यानंतर राज्य सरकारने पुढाकार घेतला. त्यानुसार बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत हे आंदोलन मागे न घेतल्यास डॉक्‍टरांचे वेतन थांबवित त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला. त्यानंतर मार्डच्या संघटनेने चर्चेची तयारी दाखवित वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्याशी चर्चेसाठी विधिमंडळ गाठले. या चर्चेनंतर विधिमंडळातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत महाजन यांनी डॉक्‍टरांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती दिली.

डॉक्‍टरांना मारहाण होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने सर्व शासकीय रुग्णालयांतील डॉक्‍टरांना सुरक्षा पुरविण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. त्यासाठी निवृत्त पोलिस अधिकारी बर्वे यांच्या संस्थेला सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम सोपविण्यात आले असून, जवळपास 1100 सुरक्षारक्षक पुढील 8 ते 10 दिवसांत सर्व रुग्णालयांत नेमण्यात येणार असल्याची गिरीश महाजन यांनी दिली.

आंदोलन मागे न घेणाऱ्या डॉक्‍टरांचे वेतन रोखण्याबरोबरच वेळप्रसंगी त्यांच्यावर मेस्मा आणि 1996 च्या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

प्रत्येक रुग्णालयात सीसीटीव्ही वाढविणे, सुरक्षा समितीची स्थापना करणे, प्रवेशासाठी एकच फाटक सुरू करणे आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा सामूहिक विमा काढण्याबाबत "मार्ड' बरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दुपारपासून जेजे महाविद्यालयाचे "डीन' डॉ. तात्याराव लहाने विधिमंडळात मध्यस्थी करण्यासाठी हजर होते.
.
"मार्ड' आंदोलनावर ठाम, आयएमएचाही पाठिंबा
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका "मार्ड'च्या पदाधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या बाहेर जाऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. सायंकाळी उशिरा इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमएने) या संबंधात पत्रक काढून संप मागे घेतला नसल्याचे नमूद केले. "मार्ड'ने संप मागे घेतला नाहीच, शिवाय मारहाणीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी "आयएमएने'ही या संपाला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती कळवण्यात आली. "आयएमए'चे 40 हजार डॉक्‍टर उद्या "ओपीडी' बंद ठेवणार असल्याचा दावा आयएमएचे पदाधिकारी डॉ. तांबे यांनी केला आहे.

Web Title: mard agitation stop