'मिनी विधानसभे'च्या कसोटीला प्रारंभ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जानेवारी 2017

दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका जाहीर 
मुंबई - राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी आज केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व संबंधित जिल्ह्यांत आज दुपारी चार वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली. निवडणूक नसलेल्या क्षेत्रांत नियमित विकासकामांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत; परंतु निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा करता येणार नाही. 

दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका जाहीर 
मुंबई - राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी आज केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व संबंधित जिल्ह्यांत आज दुपारी चार वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली. निवडणूक नसलेल्या क्षेत्रांत नियमित विकासकामांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत; परंतु निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा करता येणार नाही. 

बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 16 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 165 पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याची दोन्ही टप्प्यांत विभागणी केली आहे. सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल. 

न्यायालयीन प्रकरणांसंदर्भात सहारिया म्हणाले, की नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा या कार्यक्रमात समावेश केलेला नाही. त्याचबरोबर न्यायालयीन स्थगिती असलेल्या एखाद्या जिल्हा परिषद निवडणूक विभागाला किंवा पंचायत समिती निर्वाचक गणालाही हा कार्यक्रम लागू होणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल; तसेच अन्य काही याचिकाही दाखल झाल्या आहेत. या याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. 

महापालिका - ता. 21 फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या महानगरपालिकांतील जागा (कंसात मुदत समाप्तीची तारीख) 
- बृहन्मुंबई - 227 (8 मार्च 2017), ठाणे - 131 (5 मार्च 2017), उल्हासनगर - 78 (3 एप्रिल 2017), नाशिक - 122 (14 मार्च 2017), पुणे - 162 (14 मार्च 2017), पिंपरी- चिंचवड - 128 (12 मार्च 2017), सोलापूर - 102 (5 मार्च 2017), अकोला - 80 (8 मार्च 2017), अमरावती - 87 (8 मार्च 2017) आणि नागपूर - 151 (4 मार्च 2017). 

महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम 
- नामनिर्देशन पत्र सादर करणे - 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017 
- नामनिर्देशन पत्रांची छाननी - 4 फेब्रुवारी 2017 
- उमेदवारी माघारीची मुदत - 7 फेब्रुवारी 2017 
- निवडणूक चिन्ह वाटप - 8 फेब्रुवारी 2017 
- मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी - 8 फेब्रुवारी 2017 
- मतदान - 21 फेब्रुवारी 2017 
- मतमोजणी - 23 फेब्रुवारी 2017 

जिल्हा परिषद निवडणुका - 
पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा : जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आठ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभाग. (या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण 165 पंचायत समित्या) 
दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील चार पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभाग (या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण 118 पंचायत समित्या) 
दोन्ही टप्प्यांतील सर्व जिल्हा परिषदांची मुदत 21 मार्च 2017 रोजी; तर पंचायत समित्यांची मुदत 13 मार्च 2017 रोजी संपत आहे. 

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम 
निवडणूक कार्यक्रम तपशील पहिला टप्पा दुसरा टप्पा 

(15 जि.प. व 165 पं.स.) (11 जि.प. व 118 पं.स.) 

नामनिर्देशन पत्र सादर करणे 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 1 ते 6 फेब्रुवारी 2017 
नामनिर्देशन पत्रांची छाननी 2 फेब्रुवारी 2017 7 फेब्रुवारी 2017 
जिल्हा न्यायाधीशांकडे अपील 5 फेब्रुवारी 2017 10 फेब्रुवारी 2017 
निकालाची संभाव्य अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017 
अपील नसल्यास उमेदवारीची माघार 7 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017 
अपील असल्यास उमेदवारीची माघार 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017 
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017 
मतदानाची तारीख 16 फेब्रुवारी 2017 21 फेब्रुवारी 2017 
मतमोजणीची तारीख 23 फेब्रुवारी 2017 23 फेब्रुवारी 2017 

बहुसदस्यीय पद्धत 
बृहन्मुंबई वगळून अन्य सर्व नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतील. बहुतांश प्रभाग चार सदस्यांचे आहेत; परंतु ठाणे, अमरावती व नागपूर महानगरपालिकांतील प्रत्येकी एक प्रभाग तीन सदस्यांचा; तर उल्हासनगर, नाशिक, पुणे व सोलापूर महानगरपालिकेचे प्रत्येकी दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत, त्यामुळे मतदारांना चार किंवा तीन मते द्यावी लागतील. जिल्हा परिषदांच्या निवडणूक विभागातील उमेदवारासाठी व पंचायत समितीच्या निर्वाचक गणातील उमेदवारासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते ग्रामीण भागातील मतदारांना द्यावी लागतील. 

नामनिर्देशन पत्रांसाठी संगणकीय प्रणाली 
या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्रे व शपथ पत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे, त्यासाठी संकेतस्थळ विकसित केले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरवात झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे कुठल्याही वेळेस संगणकावर नामनिर्देशन पत्रे व शपथ पत्रे भरता येतील. त्यांची प्रिंट काढून, त्यावर सही करून ती विहीत वेळेतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. 

उमेदवारांना शपथ पत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्‍यकता नाही. नामनिर्देशन पत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज संगणकाद्वारे सादर करण्याची आवश्‍यकता नाही. उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे व शपथ पत्रे भरण्यास अडचण उद्‌भवू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक किंवा त्यापेक्षा जास्त मदत कक्षांची स्थापना करावी; तसेच सायबर कॅफे व कम्युनिटी फॅसिलिटेशन सेंटरची मदत घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

जात पडताळणी प्रमाणपत्राचा पुरावा 
उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती किंवा अन्य पुरावा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्‍यक आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद आहे. 

"ट्रू व्होटर' ऍप 
सर्वसामान्य नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी "ट्रू व्होटर' ऍप विकसित केले आहे. हे ऍप नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उपयुक्त ठरले आहे. या ऍपमुळे मतदारांना मतदार यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्र शोधता येणे शक्‍य होईल. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहितीही या ऍपच्या माध्यमातून पाहता येईल. या ऍपच्या माध्यमातून उमेदवारांना आपला दैनंदिन खर्चदेखील सादर करणे शक्‍य होईल. तसेच, निवडणुकीचा निकालही मिळू शकेल. 

मतदार नोंदणीसाठी जनजागृती 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाचीच मतदार यादी वापरली जाते. विधानसभेची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे आठ ऑक्‍टोबर ते सात नोव्हेंबर 2015 आणि 16 सप्टेंबर ते 21 ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. याचे औचित्य साधून महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मतदार नोंदणीसाठी व मतदार यादीतील तपशिलांतील दुरुस्त्यांसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. 

अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला 
या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे पाच जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. ही यादी महानगरपालिकेसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदेसाठी निवडणूक विभागनिहाय व पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. त्यावर 12 ते 17 जानेवारी 2017 पर्यंत हरकती दाखल करता येतील. त्यानंतर 21 जानेवारी 2017 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. 

मतदार यादीत याच दुरुस्त्या शक्‍य 
विधानसभेच्या मतदार यादीत नवीन मतदार म्हणून नावाच्या समावेशासाठी 21 ऑक्‍टोबर 2016 पर्यंत अर्ज केलेल्या व त्यातील भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदार यादीत समावेश असेल. विधानसभेच्या मूळ मतदार यादीत कोणत्याही दुरुस्त्या होणार नाहीत. प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुकाच फक्त दुरुस्त करता येतील. 

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना 
- विद्यापीठे व महाविद्यालयांचा मतदार जागृतीत सक्रिय सहभाग 
- सहकारी गृहनिर्माण संस्थांना सक्रिय सहभागाचे आवाहन 
- उद्योजक, बॅंक व कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद 
- हॉटेल असोसिएशनचा मतदार जागृतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद 
- उपलब्ध कम्युनिटी रेडिओचा प्रभावी वापर 
- सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती 
- नाटकाच्या मध्यंतरात थिएटरमध्ये मतदानाबाबत उद्‌घोषणा 

राजकीय पक्षांसोबत विचारविनिमय 
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत विचारविनिमय करण्यात आला आहे. त्यासाठी राजकीय पक्षांसोबत चार वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यात संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्रे भरणे, महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय पद्धत, उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी खर्च सादर करणे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. 

आयोगाकडील नोंदणीकृत पक्ष 
आतापर्यंत नोंदणी रद्द केलेले पक्ष - 220 
नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष - 15 
नोंदणीकृत राजकीय पक्ष - 190 
एकूण राजकीय पक्ष - 205 

...तर उमेदवार अनर्ह 
उमेदवारांना एकूण खर्चाचा तपशील निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावा लागेल. विहीत पद्धतीने व मुदतीत खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवारास अनर्ह केले जाईल. राजकीय पक्षांनी विशिष्ट उमेदवारावर केलेला थेट खर्च आणि उमेदवारांमध्ये विभाजित करता येणारा खर्च 20 दिवसांत सादर करणे आवश्‍यक आहे. निवडणूक खर्चासाठी स्वीकारलेला निधी व स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय एकूण खर्चाचा तपशीलही पक्षांना निकाल लागल्यानंतर 60 दिवसांच्या आत द्यावा लागेल. 

महानगरपालिका निवडणूक दृष्टिक्षेप 
महानगरपालिकांची संख्या - 10 
एकूण लोकसंख्या - 2,57,19,093 
एकूण प्रभाग - 490 
एकूण जागा - 1,268 
महिला - 636 
अनुसूचित जाती - 171 
अनुसूचित जमाती - 38 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - 343 

जिल्हा परिषद निवडणूक दृष्टिक्षेप 
जिल्हा परिषदांची संख्या - 25 
एकूण लोकसंख्या - 5,09,37,606 
एकूण जागा - 1,510 
महिला - 761 
अनुसूचित जाती - 189 
अनुसूचित जमाती - 156 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - 408 

पंचायत समिती निवडणूक दृष्टिक्षेप 
पंचायत समित्यांची संख्या - 283 
एकूण लोकसंख्या - 5,06,56,373 
एकूण जागा - 3,000 
महिला - 1,500 
अनुसूचित जाती - 386 
अनुसूचित जमाती - 293 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - 797 

Web Title: mini vidhansabha election start