केरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. अरबी समुद्रातही मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याने येत्या 48 तासांत मोसमी वारे केरळ आणि तमिळनाडूमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनने अंदमान बेटावरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा रविवारी पार केला आहे. तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरिन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागापर्यंत मोसमी वारे पोचले आहेत. मंगळवारपर्यंत (ता.29) मॉन्सून केरळात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आले. 

केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यापट्टीलगत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत (ता.28) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात पावसाची शक्‍यता 
अरबी समुद्रात केरळ, कर्नाटक किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राज्यातही जाणवणार आहे. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात सोमवार (ता.28) ते बुधवार (ता.30) दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे, तर विदर्भात सोमवारी उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Web Title: monsoon tomorrow in Kerala