महाराष्ट्रात सर्वाधिक नशाबाजांच्या आत्महत्या 

महाराष्ट्रात सर्वाधिक नशाबाजांच्या आत्महत्या 

तुर्भे - अमली पदार्थांच्या व्यसनातून तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे उघड झाले आहे. नवी मुंबईतील तरुणाईतही व्यसनांचे प्रमाण वाढले असल्याचे शहरातील उद्याने व खाडीकिनाऱ्यावरील नशाबाजांच्या वावरावरून स्पष्ट होते. 

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुण-तरुणींचा वाशी सागरविहार परिसरातील खाडीकिनाऱ्यावर वावर वाढला आहे. दुपारी निर्जनस्थळी कागदाच्या गुंडाळी करून ही मंडळी झुरके घेत असते. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. महाविद्यालयीन तरुण-तरुणी सागरविहार व मिनी सी-शोअर परिसरात फिरण्यासाठी येतात. यातील बहुतांश तरुण धुम्रपानाच्या नावाखाली अमली पदार्थ हुंगत असतात. पाऊस सुरू झाल्यावर ते येथील शेडचा आश्रय घेतात. काही तरुणी चिलीम ओढताना येथे दिसतात. या परिसरात सीसी टीव्ही असतानाही या टपोरींकडे पोलिसांचे लक्ष जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या परिसरात रोज सकाळी व सायंकाळी नागरिक मोठ्या प्रमाणात फिरायला येतात. त्यांनाही याचा त्रास होतो. येथील मुन्ना-मुन्नी पार्क आणि अन्य उद्यानांच्या कोपऱ्यात ही मंडळी अमली पदार्थांचे सेवन करत असतात. 

अमली पदार्थ विक्रीची ठिकाणे 
नवी मुंबई एपीएमसी परिसरात आणि बेलापूर येथे कोकण भवनच्या मागे टाटानगर झोपडपट्टीशेजारी अमली पदार्थांची बिनधास्त विक्री होते. येथून हाकेच्या अंतरावर पोलिस मुख्यालय असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नशेच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे. नेरूळ, जुईनगर, सानपाडा आणि वाशी या रेल्वेस्थानकांच्या परिसरातही नशाबाज घुटमळत असतात. हुक्का पार्लर बंद झाल्याने तरुण चरस, गांजा, अफूकडे वळले आहेत. 

व्यसनातून झालेल्या आत्महत्या 
वर्ष 
2012 - 4008 
2013 - 4,591 
2014 - 3,647 

महाराष्ट्रातील आत्महत्या 
2012 - 1,689 
2013 - 1,794 
2014 - 1,372 

तरुण पिढी अमली पदार्थांकडे वळली असल्याने तिला वेळीच रोखले पाहिजे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान याची माहिती त्यांना शाळा व महाविद्यालयात देऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. पोलिसांनीही अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. व्यसनमुक्ती केंद्रामार्फत नवी मुंबईत जनजागृतीसाठी शिबिर व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 
- वृषाली मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com