महाराष्ट्राची वाटचाल स्वच्छतेच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

मुंबई - राज्यातील नागरी लोकवस्तीची वाटचाल हागणदारीमुक्‍तीकडे सुरू असून, "स्वच्छ भारत अभियानां‘तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर राज्यात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्‍त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. राज्यात ही मोहीम राबवण्यात आल्यापासून आतापर्यंत शहरी भागात एक लाख 64 हजार 871 शौचालयांची उभारणी झाली आहे, तर 88 हजार 117 शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. 

"स्वच्छ भारत शहर अभियाना‘स राज्यात 15 जून 2015 रोजी सुरवात झाली. या कार्यक्रमांतर्गत राज्यात आठ लाख 32 हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. देशांतर्गत पातळीवर तुलना करताना महाराष्ट्राचा क्रमांक सर्वप्रथम लागतो. राज्याने शौचालय निर्मितीत आघाडी घेतली आहे. आतापर्यंत 100 शहरे हागणदारीमुक्‍त झाली आहेत. या मोहिमेस 14 महिने झाले आहेत. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अमरावती, औरंगाबाद या महसूल विभागांत शौचालय बांधणीची गती मंद होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील सर्व विभागांत कामाने गती घेतली आहे. राज्याच्या नगर विकास विभागातर्फे मोहीम राबवताना लोकसहभागातूनही उभारणी केली जात आहे. यासाठी एका लाभार्थीला जास्तीत जास्त 17 हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये केंद्र सरकार चार हजार व राज्य सरकार आठ हजार रुपये अशी मदत करते. स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त पाच हजार रुपये इतकी मदत करते. उरलेला खर्च लाभार्थीला उचलावा लागतो. एका शौचालयासाठी 20 हजार रुपये खर्च येतो.
 
- राज्यभरात शहरी भागासाठी उद्दिष्ट ः 8 लाख 32 हजार
- सध्या एक लाख 64 हजार 871 शौचालये पूर्ण, तर 88 हजार 117 शौचालयांचे बांधकाम सुरू
- महाराष्ट्र देशात पहिला, सिंधुदुर्ग राज्यात पहिला
 
देशपातळीवर...
1) महाराष्ट्र ः 1 लाख 64 हजार 871
2) गुजरात ः 1 लाख 59 हजार 371
3) मध्य प्रदेश ः 1 लाख 31 हजार 529
4) आंध्र प्रदेश ः 1 लाख 27 हजार 712
5) छत्तीसगड ः 76 हजार 112
 
राज्यातील शहरी भाग हागणदारीमुक्‍त करण्याचा ध्यास नगरविकास विभागाने घेतला आहे. दोन ऑक्‍टोबर 2017 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव