मुंबई-गोवा महामार्गाचे 2018 पर्यंत चौपदरीकरण - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

नागोठणे - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम नक्कीच पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

नागोठणे - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम नक्कीच पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

महाड येथील सावित्री नदीवर उभारला जात असलेला पूल व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची हवाई पाहणी गडकरी यांनी आज केली. त्यानंतर पत्रकार परिषद बोलताना ते म्हणाले, 'मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या 471 किलोमीटर मार्गातील महाराष्ट्राच्या हद्दीतील अकरा पॅकेजचे काम जवळपास 12 हजार कोटी रुपयांचे आहे. यापैकी कशेडी घाटातील एक पॅकेज व बोगदा सोडल्यास सर्व ठिकाणच्या कामाच्या निविदा निघाल्या असून काम सुरू आहे.''

आमची सत्ता येण्याआधी आघाडी सरकारच्या काळात महामार्गाचे काम सुरू झाले; पण ते फसले. दरम्यानच्या काळात सर्वांना त्रास झाला. महामार्गावरील अपघातात अनेकांचे बळी गेले. सध्या या महामार्गाचे 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. एका महिन्यात 50 टक्‍क्‍यांच्यावर काम झाल्यानंतर केंद्र सरकारकडून महामार्गासाठी 540 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे डिसेंबर 2018 पर्यंत ते नक्कीच पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सावित्री पुलाचे काम चांगल्या प्रकारे व युद्धपातळीवर होत असल्याबद्दल गडकरी यांनी राज्य सरकारच्या अभियंत्यांचे कौतुक केले. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर; तसेच भाजपचे उरण येथील नेते महेश बालदी उपस्थित होते.

सावित्री पूल 30 जूनपर्यंत
महाड येथील सावित्री पूल 2 ऑगस्टला कोसळलेला. त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे मी तेव्हा म्हटले होते. काही तांत्रिक बाबींमुळे या पुलास थोडा विलंब झाला; मात्र जून 2017 पर्यंत हा पूल उभारला जाईल. त्याचे उद्‌घाटनही 30 जूनला करण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

फोटो ओळ...
नागोठणे : पत्रकार परिषदेत बोलताना नितीन गडकरी.

Web Title: Mumbai-Goa Highway four way to 2018