राज्यातील 58 टक्‍के खड्डे "जैसे थे'

राज्यातील 58 टक्‍के खड्डे "जैसे थे'

मुंबई - यंदाच्या पावसाळ्यात राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, हे खड्डे बुजविण्यासाठी सरकारने मंत्रालयात "वॉररूम'ची स्थापना केली आहे. पाऊस थांबल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत 42 टक्‍के खड्डे बुजविण्यात आले असून, उर्वरित अंदाजे 58 टक्‍के काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान सरकार समोर आहे.

राज्यात राष्ट्रीय महामार्ग, मुख्य राज्य महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यांना जोडणारे मार्ग, अशा चार प्रकारच्या रस्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणावर आहे. राज्यातील एकूण रस्त्यांपैकी यंदा 65 टक्‍के रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळ्यात राज्यातील रस्त्यांची भीषण दुरवस्था झाल्याने या विषयी राज्य सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजपर्यंत राज्यातील 24 जिल्ह्यांतील रस्त्यांची पाहणी केली असून, उर्वरित जिल्ह्यांचा आढावा ते 30 नाव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहेत. खड्ड्यांच्या डागडुजीसाठी पाटील यांनी मंत्रालयातील दालनात "वॉररूम' सुरू केली असून, तेथे दोन शिफ्टमध्ये नऊ अधिकारी काम करत आहे. ट्‌विटरवर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचीही दखल घेतली जात आहे.

खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू असला तरी गेल्या महिन्याभरात 42 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी 15 डिसेंबर पर्यंत राज्यातील रस्ते खड्डे मुक्‍त होतील, अशी "डेडलाइन' दिल्याने ती गाठण्याचे सरकारसमोर मोठे आव्हान असल्याचे दिसून येते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, ते 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
- ए. बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, मंत्रालय वॉररूम

राज्यातील रस्ते व खड्यांचा तपशील
विभाग राज्याच्या आखत्यारीतील रस्त्यांची लांबी खड्डे पडलेले अंतर खड्डे बुजविल्याचे अंतर टक्‍केवारी
मुंबई 8634 किलोमीटर 5132 किलोमीटर 2897 किलोमीटर 56
पुणे 21022 किलोमीटर 14709 किलोमीटर 7041 किलोमीटर 48
नाशिक 16634 किलोमीटर 11753 किलोमीटर 5032 किलोमीटर 43
औरंगाबाद 20162 किलोमीटर 12107 किलोमीटर 3575 किलोमीटर 30 अमरावती 11260 किलोमीटर 5942 किलोमीटर 2180 किलोमीटर 37 नागपूर 12276 किलोमीटर 7066 किलोमीटर 3357 किलोमीटर 48
एकूण 89990 किलोमीटर 56708 किलोमीटर 24130 किलोमीटर 42

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com