आदिवासींसाठी 10 हजार घरे तयार, अनुदान आता थेट बॅंक खात्यात - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यादृष्टीने आदिवासींसाठी 25 हजारांपैकी 10 हजार घरे पूर्ण झाली आहेत. घर बांधणी अनुदान वाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी ही रक्कम थेट बॅंकेत जमा करण्यात येणार आहे. आज विविध वृत्तवाहिन्यांवरून "मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम प्रसारित झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शबरी घरकुल योजनेविषयी प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की शबरी घरकुल योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना असून, आदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. 25 हजार घरे तयार करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून, त्यातील 10 हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाला घरे मिळावीत, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. आदिवासी समाजाचा एकही व्यक्ती आता बेघर राहणार नसल्याचे ते म्हणाले.

ओंकार आगळे यांनी घरकुलासाठी मिळालेला निधी संगनमताने अन्य कामासाठी वापरला जाऊ नये यासाठी सरकारच्या काय उपाययोजना आहेत, हा प्रश्न विचारला होता. या वेळी उत्तर देताना फडणवीस म्हणाले, घरकुल निधीत गैरव्यवहार थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, घरकुलाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच होणारा खर्च कशा पद्धतीने होतो आहे, हे पाहण्यासाठी आम्ही विशेष यंत्रणाही उभी करीत आहोत.