कर्जमाफीसाठी बॅंकेत घुमणार ढोल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जुलै 2017

शिवसेनेचे राज्यात सोमवारी आंदोलन

शिवसेनेचे राज्यात सोमवारी आंदोलन
मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे बॅंकांच्या दारातच आता ढोल बडविण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत गुरुवारी निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकाने कर्जमाफी जाहीर केली असली, तरी जुन्या कर्जवसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात जात असल्याने आता कर्जमाफीसाठी बॅंकेच्या दारातच जाऊन तिथे ढोल वाजविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांमध्ये सोमवारी (ता. 10) शिवसेनेचे पदाधिकारी ढोल वाजवून कर्जमाफी देण्याची मागणी करणार आहेत.

शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, जिल्हा संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख उपस्थित होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली असली, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बॅंकेत पैसे जमा झालेले नाहीत. नेमकी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याची आकडेवारीही सरकाने दिलेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने ढोल वाजविण्याची रणनीती आखली आहे.
एरवी शेतकऱ्यांकडून कर्ज भरण्यास विलंब झाला, की बॅंकांचे अधिकारी लगेच शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज भरण्याचा तगादा लावतात. तसाच आता शिवसेनेचे पदाधिकारी बॅंकेत जाऊन कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंकेत जमा करण्यासाठी तगादा लावणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांत सकाळी अकरा वाजता त्या त्या जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जातील आणि तेथे जिल्ह्यातील कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी सूचना फलकांवर लावतील. या वेळी शेतकऱ्यांना तत्काळ पैसै देऊन कर्जमुक्त करण्यासाठी बॅंकेच्या दारातच ढोलही वाजवला जाणार आहे.