जाचक कररचनेमुळे व्यापारी, सामान्य हैराण - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नवी मुंबई - देशात वस्तू व सेवाकरावरून (जीएसटी) नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर बुधवारी टीका केली.

नवी मुंबई - देशात वस्तू व सेवाकरावरून (जीएसटी) नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर बुधवारी टीका केली.

देशात कर असावा; मात्र तो जाचक आणि चुकवणारा वाटता कामा नये, अशी कररचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली होती; परंतु सध्याच्या कररचनेमुळे नाटक व संगीताच्या कार्यक्रम पाहण्यासाठीही 19 टक्के कर द्यावे लागते, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. नवी मुंबईतील ऐरोली येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्‌घाटनावेळी पवार यांनी आंबेडकरांचे दाखले देत मोदी सरकारच्या फसलेल्या करधोरणाचा खरपूस समाचार घेतला.

पवार म्हणाले, की स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर मंत्री म्हणून सहभागी झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे काम कररचनेचे होते. याबाबत बाबासाहेबांनी एक अध्यादेश काढला होता. यात त्यांनी कररचना ही कोणाला जाचक नसावी; सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील असावी, असे स्पष्ट म्हटले होते. नव्या भारताच्या उभारणीतील बाबासाहेब एक द्रष्टे अर्थतज्ज्ञ होते, ही बाब आजच्या पिढीसमोर आजही मांडता आलेली नाही. यामुळे माझ्या जीवनात अस्वस्थतता कायम राहील, असे पवार यांनी सांगितले. याशिवाय, बाबासाहेबांनी देशाच्या विकासाला गती देण्याकरिता पायाभूत सुविधांवर भर देण्यास सांगितले. सिंचन खात्यात त्यांनी केलेल्या भरघोस कामगिरीमुळे देशाला सर्वात मोठा वीज प्रकल्प आणि मुबलक पाणीसाठा असणारा भाकरा नांगल सरोवर मिळाले. हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी रामदास आठवले यांनी महापौर सुधाकर सोनावणे आणि आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांचे आंबेडकर स्मारक उभारल्याबद्दल अभिनंदन केले. बाबासाहेबांच्या कार्याप्रमाणेच नागरिकांना समतेचा, शांततेचा संदेश देण्याचे काम हे स्मारक करेल, असा विश्‍वासही आठवले यांनी व्यक्त केला.