अपेक्षेप्रमाणे सरकारची रोजगारनिर्मिती नाही - सदानंद गौडा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या तीन वर्षांत अनेक आघाड्यांवर लक्षणीय यश मिळवले असले तरी, रोजगारनिर्मितीबाबतच्या अपेक्षा मात्र पूर्ण झालेल्या नाहीत. मोदी यासंदर्भात कौशल्य विकास प्रशिक्षणासारखे अनेक उपक्रम हाती घेत असून, या योजनांना नक्‍कीच फळ मिळेल असा विश्‍वास सांख्यिकीमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्‍त केला. तीन वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्यायला येत्या काही काळात नव्या योजना राबवल्या जातील, असेही ते म्हणाले.

रोजगारक्षम लोकसंख्या शोधण्यासाठी तसेच दारिद्य्र रेषेखाली देशात किती लोक आहेत ते पाहण्यासाठी सांख्यिकी विभागाने देशव्यापी सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या अंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागात किती रोजगार निर्माण झाले आहेत, त्याचा लाभ किती जणांना होतो आहे याचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला जाणार आहे. सध्या भारतात घेतल्या जाणाऱ्या पिकांची व्याप्ती किती, ती कोणत्या भागात घेतली जात आहेत, याचीही पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार नियोजन करण्याची पद्धत आगामी काळात राबवली जाईल, असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्षात आलेल्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही नोंदी ठेवणे तसेच भारतासारख्या मोठ्या पण महत्त्वाच्या देशात काय घडते आहे याचा अभ्यास करणे सोपे होते आहे, असेही सदानंद गौडा यांनी नमूद केले आणि ईशान्य भारत तसेच नक्षलवादग्रस्त भागात नोंदी करण्यावर भर दिला जाणार असून, त्यामुळे भारतातील परिस्थिती खऱ्या अर्थाने नियोजनकारांसमोर येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.