भारतीय बनावटीचे विमान आकाशात झेपावणार

भारतीय बनावटीचे विमान आकाशात झेपावणार

मुंबई - हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेल्या विमानाच्या उड्डाणास परवानगी दिली आहे. त्यामुळे यादव यांचे विमान काही दिवसांत आकाशात भरारी घेणार आहे.

अमोल यादव यांच्या सहा वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आले असून, भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची "डीजीसीए'ने नोंदणी केली असून, पुढच्या पंधरा दिवसांत हे विमान आकाशात झेपावणार असल्याची माहिती कॅ. यादव यांनी दिली आहे.

भारतात बनविलेले हे पहिले व्यावसायिक विमान आहे. सहा वर्षांपासून या विमानाच्या नोंदणीसाठी यादव कुटुंबीय सरकार दरबारी हेलपाटे घालत होते. कॅ. यादव यांनी आपल्या चारकोप येथील इमारतीच्या गच्चीवर या विमानाची निर्मिती केली आहे. "मेक इन इंडिया' या कार्यक्रमाच्या अंतर्गत यादव यांनी पहिल्यांदा वांद्रे इथल्या प्रदर्शनात या विमानाचे दर्शन घडविले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांचे जाहीर कौतुक केले होते.

फडणवीस यांनी त्याच वेळी यादव यांना आवश्‍यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांना पालघर जिल्ह्यात विमान तयार करण्याच्या कारखान्याला आवश्‍यक 105 एकर जमीन देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.

आता "डीजीसीए'कडून यादव यांच्या विमानाची नोंदणी होऊन त्याचे परीक्षण होणार आहे. परीक्षणानंतर विमानाला "परमीट टू फ्लाय' ही परवानगी मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी पंधरा दिवसांचा
कालावधी जाणार असल्याचे अमोल यादव यांनी सांगितले. विमानाची नोंदणीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून, यादव यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com