कमी वजनाच्या बालकांमुळे अर्भक मृत्यूची समस्या - सतीश पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातील अर्भक मृत्यू ही गंभीर समस्या इन्क्‍युबेटर अभावी नसून जन्मत: कमी वजनाची बालके जन्माला येण्यामुळे असल्याचे मत राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी व्यक्‍त केले. अर्भक मृत्यूचे प्रमाण 6 टक्‍क्‍यांपर्यंत आणण्यात यश आल्याचा दावाही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला.

मुंबई - राज्यातील अर्भक मृत्यू ही गंभीर समस्या इन्क्‍युबेटर अभावी नसून जन्मत: कमी वजनाची बालके जन्माला येण्यामुळे असल्याचे मत राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी व्यक्‍त केले. अर्भक मृत्यूचे प्रमाण 6 टक्‍क्‍यांपर्यंत आणण्यात यश आल्याचा दावाही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला.

राज्यातील अर्भक मृत्यूंबाबत "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत येत्या सोमवारी नाशिकचा दौरा करून आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पवार म्हणाले, अर्भक मृत्यूचे प्रमाण गेल्या 5 वर्षात कमी झाले आहे. 2011 मध्ये राज्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण 11 टक्‍के होते, ते आता 6 टक्‍क्‍यांवर आले आहे. मात्र अजून आदिवासी पट्ट्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आहे. नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागात हे प्रमाण 11 ते 15 टक्‍क्‍यांदरम्यान आहे. लहान वयात मुलींची लग्न होणे, माता कुपोषित असल्याने कमी वजनाची बालके जन्माला येण्याच्या समस्या आहेतच. गरोदरपणात मातेचे भरणपोषण होण्याची आवश्‍यकता असते, त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण 600 ते 800 ग्रॅमच्या वजनाची बालके जगवण्यासाठी एस. एन. सी. यू. मध्ये डॉक्‍टर सर्वोतपरी प्रयत्न करतात. मात्र अतिगंभीर असणाऱ्या बालकांपैकी केवळ 60 टक्‍के बालकेच जगतात.

अशा मुलांना खासगी रूग्णालयांमध्येही दाखल करून घेतले जात नाही.''
नाशिकमधील एस. एन. सी. यू बाबत ते म्हणाले, 'क्षमतेपेक्षा अधिक बालके सेंटरमध्ये दाखल असतील तर त्यांना दाखल करून घेतलेच जाणार, कारण खासगी रुग्णालयांत या बालकांना दाखल करून घेतले जात नाही. ही बालके गंभीर झाल्यावर त्यांना खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात पाठवले जाते. नाशिकमध्ये एप्रिल 2014 ते 7 सप्टेंबर 2017 पर्यंत 1042 अर्भकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2017 मध्ये या केंद्रात 346 अती गंभीर अर्भके दाखल झाली. त्यापैकी 55 अर्भके दगावली. मात्र 291 अत्यंत गंभीर असलेली अर्भक जगवण्यात याच डॉक्‍टरांना यश मिळाले.''

ऑगस्टमधील 55 बालकांच्या मृत्यूंच्या कारणाबाबत ते म्हणाले, 'एक किलो वजनाची 18, एक ते दीड किलोच्या आतील 12, दीड ते अडीच किलोच्या आतील 20 आणि अडीच किलोची पाच अर्भके दगावले आहेत.'' यावरून अत्यंत कमी वजनाची आणि पुरेशी वाढ न झालेली अर्भके जन्माला येऊन त्यांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जन्म झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी 18 अर्भके, तर पहिल्या ते तिसऱ्या दिवशी 29 अर्भके दगावली आहेत, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील एस. एन. सी. यू.मध्ये गेल्या पाच वर्षांत दाखल झालेली बालके
वर्ष/ सेंटरमध्ये दाखल झालेली बालके / मृत्यूची टक्‍केवारी

2011 - 2012 / 25 हजार 147 / मृत्यूचे प्रमाण 11 टक्‍के
2012 - 2013 / 35 हजार 610 / मृत्यूचे प्रमाण 11 टक्‍के
2013 - 2014 / 40 हजार 81 / मृत्यूचे प्रमाण 10 टक्‍के
2014 - 2015 / 47 हजार 515 / मृत्यूचे प्रमाण 9 टक्‍के
2015 - 2016 / 49 हजार 853 / मृत्यूचे प्रमाण 7 टक्‍के
2016 - 2017 / 50 हजार 373 / मृत्यूचे प्रमाण 7 टक्‍के
2017 (जुलैपर्यंत) / 17 हजार 730 / मृत्यूचे प्रमाण 6 टक्‍के