स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र मार्गदर्शक - राष्ट्रपती कोविंद

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने टाकलेली पावले मैलाचा दगड ठरत असून, ही वाटचाल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक असल्याचे कौतुकोद्‌गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे काढले.

मुंबई - स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने टाकलेली पावले मैलाचा दगड ठरत असून, ही वाटचाल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक असल्याचे कौतुकोद्‌गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे काढले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित करण्यासंदर्भातील कार्यक्रमात कोविंद बोलत होते. या वेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

कोविंद म्हणाले, की 2019 पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ होण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान कौतुकास्पद आहे. राज्याने नागरी भाग स्वच्छ केला आहे. यासाठी सर्व नागरी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, राज्याचे अधिकारी, स्वच्छता कामगार कौतुकास पात्र आहेत. राज्याने 31 मार्च 2018 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केल्याचे समजून आनंद वाटला. या माध्यमातून राज्याने महात्मा गांधींजींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त (ओडीएफ) जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने तीन स्तरांवर काम केले. ओडीएफ जाहीर करण्यासाठी लोकांची मानसिकता तसेच सवयी बदलण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने ओडीएफ वॉच सुरू केले. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग पथके स्थापन करून या कामाला पुढे नेले. हे काम इतक्‍यावरच न थांबवता लोकांनी शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून आगामी 6 महिन्यांत प्रोत्साहित केले जाईल, जेणेकरून या कामात सातत्य राहील.

नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच सफाई कामगार अशा सर्व घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याशिवाय या मोहिमेत सहभागी संस्था तसेच तज्ज्ञांनाही गौरविण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय पुरस्कारही देण्यात आले. यामध्ये पाटण (जि. सातारा) मधील मान्याचीवाडी, रोहा (रायगड) तालुक्‍यातील धाटाव, नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, अनंतपाळ (लातूर)मधील धामणगाव शिरुळ, मेहकर (बुलडाणा)मधील पांगारखेड आणि लाखणी (जि. भंडारा) येथील शिवणी (मो) या गावांना पुरस्कार मिळाले.

राज्याने गेल्या दोन वर्षांत 40 लाख शौचालयांची निर्मिती केली असून, हा कार्यक्रम लोकचळवळ ठरल्याने यशस्वी झाला आहे. येत्या 31 मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करून पंतप्रधानांनी पाहिलेले संपूर्ण हागणदारीमुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम राज्य शासन करेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री