ताकद दाखवली... आता लक्ष्य अपेक्षापूर्तीचे!

संजय मिस्कीन
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक व राजकीय वातावरण वर्षभरापासूनच ढवळून काढले होते. मराठ्यांचा रोष, आवेश व जोश यांची ताकद आतापर्यंत ५७ मोर्चांत दिसली; त्याचप्रमाणे आजच्या मुंबईतल्या मोर्चातही त्यात कसर राहिली नाही. मराठा संघटनांमधील सर्व मतभेद बाजूला सारत मुंबईच्या महामोर्चात सर्व जण सहभागी झाले होते.

नोटाबंदीनंतर मराठा मोर्चाला लगाम बसल्याची टीका करणाऱ्यांना आजच्या मोर्चाने आत्मचिंतन करण्यास नक्‍कीच भाग पाडले. 

मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक व राजकीय वातावरण वर्षभरापासूनच ढवळून काढले होते. मराठ्यांचा रोष, आवेश व जोश यांची ताकद आतापर्यंत ५७ मोर्चांत दिसली; त्याचप्रमाणे आजच्या मुंबईतल्या मोर्चातही त्यात कसर राहिली नाही. मराठा संघटनांमधील सर्व मतभेद बाजूला सारत मुंबईच्या महामोर्चात सर्व जण सहभागी झाले होते.

नोटाबंदीनंतर मराठा मोर्चाला लगाम बसल्याची टीका करणाऱ्यांना आजच्या मोर्चाने आत्मचिंतन करण्यास नक्‍कीच भाग पाडले. 

मुंबईत मराठा समाज एकवटणार का, किती संख्येने मराठे येणार, शिस्त व संयम यांचे काय होणार, या सर्व विषयांची मागील आठवडाभर चर्चा होती; पण राज्याच्या कानाकोपऱ्यातून व गावखेड्यातून मराठा युवक मिळेल त्या वाहनाने मुंबईत दाखल झाले. ‘आता नाही तर पुन्हा कधी नाही’ या भावनेने पेटून उठलेल्या मराठ्यांच्या निःशब्द एल्गारची चाहूल काल रात्रीपासूनच लागली होती. मोर्चाची जागा अपुरी पडेल, हा अंदाज अखेर मराठ्यांनी खरा ठरवला. मराठा समाजात प्रस्थापित व्यवस्थेसोबत शेती व शिक्षणासंदर्भात असलेला रोष मनात घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा मुंबईत दाखल झाला.

नियोजनाच्या बाबतीत मराठा मोर्चाची आदर्श आचारसंहिता ही देशभरात एक अभ्यासाचा विषय बनलेली असल्याने प्रत्येक जण स्वयंशिस्तीने मोर्चात सहभागी झाला होता. आज मुंबईत प्रचंड उकाडा असतानाही अत्यंत शांततेने मराठा समाज आझाद मैदानात घामाच्या धारा पुसत बसला होता. शिक्षण व नोकरीतले आरक्षण, शेतमालाला भाव या कळीच्या मागण्या आज मान्य होतील, या अपेक्षेने मराठा बांधव एकवटला होता. आजच्या आज या मागण्या मान्य होणार नाहीत हे माहीत असतानाही सरकारवर दबावतंत्राचा वापर व्हावा, या हेतूने संख्याबळ दाखवत मराठ्यांनी आज एक बाजू तर जिंकली; मात्र सरसकट सर्व मागण्या पूर्ण करून घेता आल्या नसल्या, तरी शिक्षण व शेतीच्या बाबतीत काहीतरी संधी मिळण्याची खात्री सरकारच्या आश्‍वासनामुळे आज मराठ्यांना पटली. 

एका बाजूला अखेरचा मूक मोर्चा अन दुसऱ्या बाजूला मागण्यांची पूर्तता, अशी दुधारी मानसिकता मराठा समाजाची होती. सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचे स्वागत या जमावाने केले असले, तरी यामधून पूर्ण समाधान नसल्याची भावना मात्र मोर्चानंतर कायम होती. त्यातच अचानक राजकीय नेत्यांनी व्यासपीठावरून पहिल्यांदाच मराठा मोर्चासमोर सरकारची भूमिका मांडल्याचा संतापही मोर्चेकऱ्यांमध्ये होता. 

आता मराठा क्रांती मूक मोर्चाची सांगता झालेली असली, तरी समाजाच्या मनातला रोष मात्र अजूनही कायम आहे. समाजाने ताकद तर दाखवली. आता सरकारने अपेक्षापूर्तीची जबाबदारी पार पाडायला हवी, अशी अपेक्षा मोर्चातल्या युवकांची होती. अखेर, राजकारण जिंकले की समाज जिंकला? याचा विचार मनात घेऊन मोर्चेकरी शांत व संयमाने परत फिरले असले, तरी आंदोलनाची धग मात्र कायम राहिल्याची सल दिसत होती.