अभूतपूर्व बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

अनेक भागांना छावणीचे स्वरूप; 25 ठिकाणी दुर्बिणीद्वारे मोर्चावर लक्ष 

मुंबई - मराठा क्रांती महामोर्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे अनेक भागांना छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राणीची बाग व आझाद मैदानादरम्यान 25 महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस सर्वांत उंच इमारतींवरून दुर्बिणीच्या साह्याने मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत. 

अनेक भागांना छावणीचे स्वरूप; 25 ठिकाणी दुर्बिणीद्वारे मोर्चावर लक्ष 

मुंबई - मराठा क्रांती महामोर्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे अनेक भागांना छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राणीची बाग व आझाद मैदानादरम्यान 25 महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस सर्वांत उंच इमारतींवरून दुर्बिणीच्या साह्याने मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत. 

मुंबई पोलिस दलातील सुमारे 50 हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. राज्यभर झालेले मोर्चे शांततेत पार पडल्यामुळे मुंबईतील या महामोर्चाला गालबोट लागू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. सीसी टीव्हीने सुसज्ज असलेल्या दोन वाहनांद्वारेही मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. दहशतवादविरोधी पथक, गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी विभाग (एटीसी) पथकांतील पोलिस साध्या वेशात मोर्चावर विशेष लक्ष ठेवणार आहेत. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या विशेष शाखेकडून कोणतीही गंभीर माहिती मिळाली नाही; परंतु सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे. 

रेल्वे पोलिसांवर विशेष जबाबदारी 
मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणारे बहुसंख्य नागरिक रेल्वेने मुंबईत दाखल होणार असल्यामुळे भायखळा, डॉकयार्ड, दादर आदी ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ते मोर्चेकऱ्यांची संख्या नियंत्रण कक्षामार्फत मुंबई पोलिसांना देणार आहेत. मोर्चासाठी पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक निघाले आहेत. त्यांची माहिती स्थानिक पोलिसांकडून मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेला देण्यात येत आहे. त्यानुसार मोर्चात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा अंदाज बांधण्यात येणार आहे. 

महत्त्वाची ठिकाणे 
राणीची बाग, खडा पारसी जंक्‍शन, होंडा कॉर्नर जंक्‍शन, मगदुमशहा उड्डाणपूल (जे.जे. पूल), एमआरए मार्ग पोलिस ठाणे व आझाद मैदान आदी बंदोबस्ताच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे आहेत. तेथील इत्थंभुत माहितीची मुख्य नियंत्रण कक्ष, दक्षिण प्रादेशिक व मध्य प्रादेशिक नियंत्रण कक्षावरून देवाण घेवाण होणार आहे. 

अतिरिक्त कुमक 
मोर्चासाठी दक्षिण व मध्य प्रादेशिक विभागातील पोलिसांसह इतर विभागांतूनही अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. त्यात सशस्त्र पोलिस दल, पूर्व प्रादेशिक विभाग, पश्‍चिम प्रादेशिक विभाग, उत्तर प्रादेशिक विभाग, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्य नियंत्रण कक्ष येथील सहा सहायक पोलिस आयुक्त, 33 पोलिस निरीक्षक, 43 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 600 पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. याशिवाय 31 महिला सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच 150 महिला पोलिसांचा समावेश आहे. 

विशेष तैनात 

मध्य विभाग 
आरसीपी 1 प्लाटून (सशस्त्र पोलिस), 1 गॅस स्कॉर्ड, 1 वरुण (पाण्याचा टॅंकर), 15 मोठी वाहने, 25 वॉकीटॉकी, 1 सीसी टीव्ही, 5 दुर्बिण असलेले पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी, 1 बीडीडीएस स्कॉर्ड 

दक्षिण विभाग 
17 मोठी वाहने, राज्य राखीव पोलिस दलाच्या 6 तुकड्या, पश्‍चिम विभागासाठी राखीव एक कंपनी व एक प्लाटून, उत्तर विभागाकडून दोन प्लाटून, 5 गॅस स्कॉर्ड, 20 दुर्बिण असलेले सशस्त्र पोलिस, डीएफएमडी 30, एचएचएमडी 30, 2 व्हिडीओग्राफर, 40 वॉकीटॉकी, शीघ्रकृती दल 6 तुकड्या, सीसी टीव्ही 1, 10 मार्क्‍समॅन वाहने व 5 कॉम्बॅट वाहने. 

दृष्टिक्षेप 
- भायखळ्यापासून आझाद मैदानापर्यंत सुमारे 25 उंच इमारतींवर दुर्बिण असलेले पोलिस तैनात राहणार आहेत. ते मोर्चातील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. 
- पोलिस आयुक्तालयात राज्य राखीव पोलिस दलाची एक प्लाटून राखीव, महाराष्ट्र राज्य पोलिस दलाकडून मिळालेल्या 4 कंपन्या यांचा समावेश असेल. 

राखीव पोलिस बंदोबस्त 
बंदोबस्ताला तैनात पोलिसांव्यतिरिक्त आपत्कालीन स्थितीत प्रत्येकी 100 असे 300 पोलिस मुंबई पोलिस आयुक्तालय, आझाद मैदान व मध्य प्रादेशिक परिमंडळ कार्यालय राखीव ठेवण्यात येणार आहेत. 

विशेष सहा पथके 
गस्त घालण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अथवा पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहा पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक पथकामध्ये 20 पोलिस अंमलदारांचा समावेश आहे.

Web Title: mumbai maharashtra news maratha kranti morcha police bandobast