नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्‍चित

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

विधान परिषदेवर निवडून देताना भाजपची होणार दमछाक; "राष्ट्रवादी'च्या मतांसाठी हालचाली

विधान परिषदेवर निवडून देताना भाजपची होणार दमछाक; "राष्ट्रवादी'च्या मतांसाठी हालचाली
मुंबई - नारायण राणे यांनी आजअखेर स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या राज्य सरकारमध्ये घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्‍चित झाल्याचे मानण्यात येते. मात्र विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता विधान परिषदेवर राणे यांना निवडून आणताना भाजपची दमछाक होणार असल्याने राणे यांच्यासाठी "राष्ट्रवादी'कडून मतांची रसद पुरविण्यासाठी हालचालींना सुरवात झाली.

स्वतंत्र पक्षाची घोषणा करताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले, मात्र भाजपची ध्येयधोरणे कशी चांगली आहेत, हे सांगताना त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांतच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. या वेळी महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्याप्रमाणे राणे यांचा घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात समावेश होईल. त्यांच्याकडे महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राणे यांना सहा महिन्यांत आमदार करावे लागेल. राज्यात विधानसभेची कुठेही पोटनिवडणूक नसल्याने राणे यांच्या राजीनाम्याने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणावे लागेल. विधानसभेत भाजपचे सर्वाधिक 122, शिवसेनेचे 63, कॉंग्रेसचे 42, राष्ट्रवादीचे 41 आणि अन्य 20 असे संख्याबळ आहे. दोन्ही कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 83 आहे. भाजपच्या तुलनेत ते अगदी नगण्य आहे. मात्र, शिवसेनेची राणेविरोधाची भूमिका स्पष्ट असल्याने भाजपसमोरचा पेच कायम राहणार आहे.

नारायण राणे आणि शिवसेनेचे वैर उघड आहे. "एनडीए'मध्ये शिवसेना सहभागी असली, तरी शिवसेना नेते काही धोरणांवर ठाम असल्याचे काही घटनांवरून सिद्ध झाले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उघडपणे कॉंग्रेसला मतदान केले आहे. हाच पॅटर्न विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत लागू होण्याची शक्‍यता आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीकडून राणे यांना मदतीसाठी राणे यांच्यासह भाजपतील काही नेते प्रयत्नशील असतील. या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची चर्चा आहे.

दोन्ही कॉंग्रेस व शिवसेनेत समझोता?
नारायण राणे यांच्या पराभवासाठी दोन्ही कॉंग्रेसना शिवसेनेच्या 63 आमदारांची रसद मिळेल किंवा दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात समझोता झाल्यास ही निवडणूक लढण्याची संधी शिवसेनेलाही मिळू शकते. भाजपचे 122 आमदार विरुद्ध दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना अशी एकूण 146 मतांची टक्‍कर होऊ शकते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना वगळता उर्वरित 20 आमदार भाजपने मॅनेज केले, तरी त्यांची संख्या 142 पर्यंत पोचते. म्हणजेच ही पोटनिवडणूक भाजपसाठी अवघड आहे.

Web Title: mumbai maharashtra news narayan rane involve in mantrimandal