हागणदारी मुक्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा - लोणीकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वच्छ भारत अभियान राबविण्यात महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविताना महाराष्ट्रात लोक चळवळ निर्माण झाली म्हणून हे शक्‍य झाले. 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे केले.

केंद्रातील पेयजल व स्वच्छता मंत्रालय आणि राज्यातील पाणी पुरवठा स्वच्छता विभाग यांच्या वतीने "स्वच्छथॉन 1.0' या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विभागाचे अपर मुख्य सचिव श्‍यामलाल गोयल, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या सहसचिव व्ही. राधा, राज्य सॅनिटेशन प्रमुख रुचेस जयवंशी, "युनिसेफ'च्या क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, ऑबझर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोणीकर म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली त्यानंतर स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांनी सहभाग दिल्याने राज्यात 11 जिल्हे, 156 तालुके, 18 हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. राज्यात कुटुंब संवाद, लोटाबंदी असे विविध उपक्रम राबविण्यात आले.'' "स्वच्छथॉन' हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांकडून नवनवीन कल्पना याव्यात हा "स्वच्छथॉन'चा उद्देश असल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले.

"स्वच्छथॉन 1.0'ची उद्दिष्टे
- शौचालयाचा वापर करणे
- सामाजिक वर्तणुकीतील बदल
- अवघड क्षेत्रातील शौचालय तंत्रज्ञान
- शाळेतील शौचालय वापर, दुरुस्ती व देखभाल यावर मार्ग काढणे,
- वस्तूंची तांत्रिक पद्धतीने विल्हेवाट लावणे
- विल्हेवाटीसाठी राष्ट्रीय पातळीवर मार्ग शोधणे