मुख्यमंत्र्यांनी घातले महेतांना पाठीशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

राजीनाम्याची मागणी फेटाळली; पारदर्शीपणे चौकशी करण्याचे आश्‍वासन

राजीनाम्याची मागणी फेटाळली; पारदर्शीपणे चौकशी करण्याचे आश्‍वासन
मुंबई - गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची पारदर्शीपणे चौकशी केली जाईल. मात्र, विरोधक राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचा थेट आरोप करीत महेतांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळत त्यांना पाठीशी घातले.

प्रकाश महेता यांचे लागेबांधे असल्याच्या आरोपावरून विधान परिषदेचे अधिवेशन गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद पडले. "झोपु' प्रकरणातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी महेता यांची चौकशी जाहीर करूनही विरोधकांची त्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप फडणवीस यांनी विधान परिषदेत केला. जो निर्णय झालाच नाही, जी प्रक्रिया सुरूच झाली नाही, त्यात भ्रष्टाचार कसा होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची पारदर्शी पद्धतीने चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले; मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सभापतींच्या आसनापुढील हौद्यात उतरून घोषणाबाजी केली.

'महेता व "समृद्धी' महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्‍याम मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराचे नवनवीन पुरावे समोर येत असून, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी या दोघांना संरक्षण न देता मंत्री महेता यांना पदावरून हटवावे, तसेच मोपलवार यांना निलंबित करावे, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही,'' असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज दिला. मुंडे यांच्या इशाऱ्यानंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तत्पूर्वी, विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच मुंडे यांनी मंत्री महेता व मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराचे नवीन पुरावे सभागृहात सादर केले. ज्या व्यक्तीने मोपलवारांविरुद्ध तक्रार केली, त्या व्यक्तीला धमक्‍या येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपच्या स्मिता वाघ यांनी लातूरमधल्या महिला तस्करीचा मुद्दा उपस्थित करीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या पूनम शहाणे यांनी तीनशे मुलींची तस्करी केल्याचा आरोप केला. या वेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी होऊन सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

प्रकाश महेता का उल्टा चष्मा
परिषदेत विरोधी पक्षाने फलक झळकावले. "प्रकाश महेता का उल्टा चष्मा... मी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली; पण राजीनामा देणार नाही,' असे फलकांवर लिहिले होते.

Web Title: mumbai maharashtra news politics by devendra fadnavis