अनियमित शिक्षक भरती; अधिकाऱ्यांवर फौजदारी करणार - विनोद तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती अनियमित असल्याचे आढळून आल्यावर ही शिक्षक भरती तात्काळ रद्द करण्यात आली आहे. या सदंर्भातील सर्व गुन्ह्यांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीला पूर्णपणे बंदी असताना शिक्षण अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या बेकायदा शिक्षक नेमणुकीबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना तावडे बोलत होते. या वेळी सदस्य अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

तावडे म्हणाले, शिक्षकांची पदभरती अनियमित असून, शिक्षक, संस्थाचालक आणि अधिकारी अशा एकूण 67 अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. शिक्षकांची नेमणूक तात्काळ रद्द केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असून, अंतर्गत बडतर्फी, सेवानिवृत्ती वेतन रोखून धरणे अशी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

सखोल चौकशीनंतरच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही तावडे यांनी सांगितले.