भाजपचे आजपासून राज्यभर शिवार संवाद अभियान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 मे 2017

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग
मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.

राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या सभांचे नियोजन करीत आहेत.""पक्षाच्या शिवार संवाद सभा या उपक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता.25) एकाच दिवशी चार हजार गावांमध्ये सकाळी दोन व सायंकाळी दोन अशा चार हजार सभा होणार आहेत. हा उपक्रम रविवारी (ता.28) पूर्ण होईल. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपचे लोकप्रतिनिधी संवाद करतील.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्री मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात आणि दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद करतील. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार; तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे व बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील.

या उपक्रमामध्ये पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत.