दुकाने, हॉटेल, चित्रपटगृहे आता 24 तास खुली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे चोवीस तास खुली ठेवण्याची तरतूद असलेले विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या काळात लहान-मोठ्या दुकानांसह मॉलचा टिकाव लागावा, यासाठी वेळेचे निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, याबाबतच्या विधेयकाला आज विधान परिषदेने मंजुरी दिली.

ऑनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा फटका किराणा दुकानांपासून मोठ्या मॉलवरला बसला आहे. त्यामुळे दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे चोवीस तास खुली ठेवण्याबाबतचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासंदर्भातील विधेयक गुरुवारी मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडण्यात आले होते. विधान परिषदेने आज या विधेयकाला मंजुरी दिली.

नव्या विधेयकानुसार महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या परवानगीने रात्री 9.30 नंतर सकाळी सात वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महिलांना सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणे सक्तीचे करण्यात आले आहे. रात्री काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या निवासस्थानापासून ने-आण करण्याची अट या विधेयकात घालण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रारी आल्यास परमिट रूम, बार, स्पा, मसाज पार्लर, हॉटेल आणि दुकानांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्याची तरतूदही आहे.