मराठा शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या आराखड्यावर "सारथी'चे काम सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यावर आधारित मराठा-कुणबी-बहुजन समाजाचा शेतीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य करण्यासाठीचा आराखडा निर्मितीचे काम सुरू झाले आहे.

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यावर आधारित मराठा-कुणबी-बहुजन समाजाचा शेतीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य करण्यासाठीचा आराखडा निर्मितीचे काम सुरू झाले आहे.

राज्य सरकारने यासाठी ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)ची स्थापना केली आहे. या सारथी संस्थेची दोन दिवसांची कार्यशाळा पुण्यातील "यशदा'मध्ये नुकतीच पार पडली.

समाजातील शेतीच्या संबधित सर्वोच्च संस्था, तज्ज्ञ, विचारवंत, माजी सनदी अधिकारी, हवामान विभागाचे तज्ज्ञ अधिकारी, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक यांच्या माध्यमातून शेती विकास, शेतीपूरक व्यवसाय व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या योजना, उद्योग कशा पद्धतीने उभे करावेत. राज्यातील शेतकऱ्यांचा मानव विकास निर्देशाकांत वाढ होऊन आर्थिक सक्षमता व शाश्‍वत शेती विकासाला चालना मिळेल, यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम "सारथी' करणार आहे.

या संस्थेच्या सूचना व शिफारशींच्या आधारे राज्य सरकार शेती, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व उद्योग व्यवसायवाढीला चालना देणाऱ्या योजना राबवणार आहे.

दोन दिवसांच्या कार्यशाळेत निमंत्रित तज्ज्ञांनी शेती व समस्या यावर चर्चा करून काही उपायोजना सुचवल्या. राज्यातील शेतकऱ्याला जगाची बाजारपेठ मिळवून देत असताना समूहगटांच्या माध्यमातून विकासची गती पकडणाऱ्या अनेक बाबींवर कार्यशाळेत चर्चा झाली.

यानंतर अशा प्रकारच्या अनेक कार्यशाळा होणार असून तज्ज्ञांच्या सहभागाने व सूचना, शिफारशीतून सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.