टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई  - राज्यातील तूर खरेदी केंद्रांवर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले; मात्र या तुरीची खरेदी करताना ती शेतकऱ्यांची आहे, की व्यापाऱ्यांची याची काटेकोर तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार डॉ. अनिल बोंडे, आशिष देशमुख, संजय कुटे, प्रशांत बंब आदींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन दिले. तूर खरेदीची शेवटची मुदत 10 जूनपर्यंत असताना शेतकऱ्यांची तूर पावसाने भिजू नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 31 मेपर्यंत तुरीचे टोकन घेण्याचे सूचित करण्यात आले होते; मात्र 10 जूनला तूर खरेदी थांबविल्यानंतर टोकनधारक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले असल्याची तक्रार या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.

याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत; मात्र ही तूर शेतकऱ्यांचीच खरेदी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी करता कामा नये. याबाबत संबंधित यंत्रणेने काटेकोर तपासणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले.