महाविद्यालयात प्रवेश घेतानाच मिळणार मतदार नोंदणीचा अर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 जून 2017

निवडणूक आयोगाची 1 जुलै ते 31 जुलैदरम्यान विशेष मोहीम

निवडणूक आयोगाची 1 जुलै ते 31 जुलैदरम्यान विशेष मोहीम
मुंबई - नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदविणे सोपे जावे यासाठी भारत निवडणूक आयोग 1 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहीम राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहे, अशी माहिती उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी आज दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेसंदर्भात मंत्रालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत वळवी यांनी माहिती दिली. या वेळी अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. वळवी म्हणाले, की राज्यात 18 ते 19 या वयोगटातील 12 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी तसेच युवा वर्गात मतदानासंदर्भात प्रबोधन व्हावे या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जासोबतच नमुना - 6 सुद्धा घेण्यात येणार आहे. यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.