गोदाममालकांना थकीत भाडे मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - आधारभूत हमी धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या साठवणुकीसाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे 2009 पासून थकीत असलेले गोदाम भाडे तातडीने देण्यात यावे, असा आदेश सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालायात गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

विदर्भातील धान उत्पादक पाच जिल्ह्यांतील धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बडोले यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच मंत्रालयात बैठक पार पडली होती. या संबंधी माहिती देताना बडोले म्हणाले, की अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या दालनात झालेल्या सदर बैठकीत या संस्थांनी अनेक समस्या मांडल्या. आधारभूत हमीभाव धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे 2009 ते 2016 पर्यंतचे भाडे गोदाममालकांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढील हंगामात गोदाम भाड्याने देण्यास नकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे गोदाममालकांना तातडीने प्रलंबित भाडे देण्याचा आदेश दिला आहे.