राम मंदिरप्रकरणी आम्ही कोर्टाला मानत नाही - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुंबई - न्यायालयाला विचारून राम मंदिरचे आंदोलन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही, अशी वादग्रस्त भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मांडली.

मुंबई - न्यायालयाला विचारून राम मंदिरचे आंदोलन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही, अशी वादग्रस्त भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मांडली.

बाबरी मशीदप्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयात संजय राऊत शुक्रवारी (ता. 14) हजर राहणार आहेत. त्यापूर्वी आज लखनौ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केले. अयोध्येचा प्रश्‍न हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेचा निवाडा न्यायलय करू शकत नाही, अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती, असे सांगून आम्ही न्यायालयाला विचारून आंदोलन केलेले नसल्याचे राऊत म्हणाले. बाबरी मशीदप्रकरणी लखनौ आणि रायबरेली अशा दोन ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांविरोधात खटले सुरू आहेत. या दोन्ही ठिकाणचे खटले लखनौमध्ये एकत्रित चालवण्याचा आदेश मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

राम मंदिरावरून शिवसेनेने प्रत्येक वेळेला भाजपला लक्ष्य केले आहे. आताही राम मंदिरबाबात परखड भूमिका घेऊन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. राऊत यांनी वेळोवेळी राम मंदिर बांधण्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले आहे.