अर्भक मृत्यू रोखण्यासाठी डॉक्‍टरांची समिती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

"सकाळ'च्या वृत्तानंतर आरोग्य मंत्र्यांची घोषणा, आज आढावा घेणार

"सकाळ'च्या वृत्तानंतर आरोग्य मंत्र्यांची घोषणा, आज आढावा घेणार
मुंबई - राज्यातील बालमृत्यू, अर्भकमृत्यू, उपजत मृत्यू रोखण्यासाठी एन.आय.सी.यू.मध्ये अर्भकांची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अर्भक मृत्यू कमी होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी "सकाळ'ला दिली. "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या "इन्क्‍युबेटरचा कोंडवाडा' या बातमीची सार्वजनिक आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी समितीची घोषणा केली. दरम्यान, राज्यभरातील रुग्णालयांतील स्थितीचा आढावा आरोग्यमंत्री उद्या मंत्रायालयात घेणार आहेत.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, ""नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणतः 761 म्हणजे 47 टक्के बालके ही इतर रुग्णालयांतून तेथे दाखल करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ही 865 म्हणजे 53 टक्के इतकी आहे. विशेष नवजात दक्षता कक्षात दाखल करण्यात आलेल्या 90 टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यातील 30 टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते बऱ्याचदा गर्भामध्ये अर्भकाकडून मिकोनियम स्राव गिळल्यामुळे आणि तो फुप्फुसात गेल्याने त्याला फुप्फुसांचा संसर्ग होतो. त्यामुळे अशा बालकांची श्वसन क्षमता आणि हृदयक्षमता ही बेताचीच असते. अकाली जन्मलेल्या, कमी वजनाच्या बालकांनची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतूसंसर्ग होतो. अनेकदा खासगी रुग्णालयातून अशा प्रकारची "क्रिटिकली इल' बालके शेवटच्या क्षणी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवली जातात, त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होते. बाहेरून पाठविण्यात आलेल्या अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येते.''

नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने अद्याप परवानगी न दिल्याने 50 खाटांच्या नवजात अतिदक्षता कक्षाचे काम सुरू होऊ शकले नाही. ही परवानगी वेळेत मिळाल्यास कक्षाचे काम वेळेत पूर्ण करणे शक्‍य होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

तसेच राज्यातील कार्यरत 36 एन.आय.सी.यू.मध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचा देखील समावेश आहे. यात 600 ते 1000 ग्रॅम वजना पर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात या शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.