शिवसेना सचिवांवर नेते नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

पक्षप्रमुखांसमोरच कदम, कीर्तीकरांचा संताप
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्‍वासू आणि पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांच्याविषयी नेत्यांनी सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पक्षप्रमुखांसमोरच कदम, कीर्तीकरांचा संताप
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्‍वासू आणि पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांच्याविषयी नेत्यांनी सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

"मातोश्री'वर झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीत नेत्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. मग, आमदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर कशी, असा प्रश्‍न उपस्थित करत पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तीकर यांनी पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केली. अनिल देसाई आणि विनायक राऊत उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्‍वासू मानले जातात.

खासदारांवर लक्ष ठेवण्यासाठी खास देसाई यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचीही उद्धव यांची इच्छा होती. देसाई यांच्याबरोबरच राऊत यांचाही पक्षाच्या कारभारात मोठा सहभाग असतो. खासकरून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांच्या शब्दाला नेत्यांपेक्षा जास्त महत्त्व दिले जात असल्याचे समजते. नेत्यांच्या नाराजीचा स्फोट आज उद्धव यांच्यासमोरच झाला. पदाधिकारी निवडताना नेत्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. मग, आमदार निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांची कशी. हे पदाधिकारी शिवसेना भवनात आल्यावर ठराविक लोकांनाचीच विचारपूस करतात. मग, आम्ही कशाला शिवसेना भवनात जावे, नियुक्ती होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादीही दाखवली जात नाही, अशा शब्दांत कीर्तीकर आणि कदम यांनी मनातल्या खदखदीला वाट करून दिली.

गंभीर दखल
नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही त्याची गंभीर दखल घेतली आहे. नेत्यांना विचारात घेऊनच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी नाराज नेत्यांना दिली, असे सूत्रांनी सांगितले.