मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीतच 

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीतच 

मुंबई - मंजुळा शेट्येचा मृत्यू कारागृहातील बाथरूममध्ये घसरून झाला, असे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र करणाऱ्या गृह विभागाला आपलेच प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे मान्य करावे लागले. मंजुळा शेट्येचा मृत्यू पोलिस कर्मचाऱ्यांच्या माराहाणीतच झाल्याची कबुली गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज देत या प्रकरणाची चौकशी मोक्‍कांतर्गत केली जाणार असल्याची घोषणा केली. 

मात्र, या प्रकरणातील दोन्ही तुरुंग अधीक्षकांना आणि या प्रकरणात सुरवातीला चौकशी अधिकारी असणाऱ्या पोलिस महानिरीक्षक (कारागृह) स्वाती साठे यांना सहआरोपी करण्याची मागणी राज्य सरकारने फेटाळल्याने विधान परिषदेत ही लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ आली. 

बंद दरवाजाच्या आत मंजुळा शेट्येला संघटितपणे कसे मारण्यात आले, याचे इत्थंभूत वर्णन रणजित पाटील यांनी केले. विधानसभा आणि विधान परिषदेत मंजुळा शेट्येच्या कारागृहातील मृत्यूवरची लक्षवेधी गाजली. विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी, तर परिषदेत नरेंद्र पाटील आणि धनंजय मुंडे यांनी ती मांडली. रणजित पाटील यांनी हा घटनाक्रम सांगत सरकारी अधिकाऱ्यांकडून झालेल्या चुका काही प्रमाणात मान्यही केल्या. मंजुळा शेट्येच्या मृत्यूचा चुकीचा अहवाल देणाऱ्या जे. जे. रुग्णालयातल्या डॉक्‍टरला, तसेच न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दिलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशी करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी सभागृहाला दिले. या घटनेचे कारागृहातील सीसीटीव्ही चित्रण असल्याने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकरसह अन्य पाच महिला कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

पोलिस कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद करून मंजुळा शेट्येला मारहाण केली. ही मारहाण करताना कर्तव्यावर नसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात आले, अशी माहिती पाटील यांनी दिली. शेट्ये यांच्या शरीरावर 17 जखमा, तर अंतर्गतही अनेक जखमा होत्या. या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल पुरेसा नसल्याचे सरकारचे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून, याबाबत अधिक चौकशी केली जाईल असे आश्‍वासन दिले. तसेच, संघटितपणे हा गुन्हा घडल्याने मोक्‍कांतर्गत यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासनही दिले. या प्रकरणाची राज्य महिला आयोगामार्फत एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी स्वाती साठे यांनी या प्रकरणाच्या चौकशी अधिकारी असताना आरोपींना वकील मिळवून देण्यासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करून आरोपींची पाठराखण केल्याने त्यांच्या हेतूवर शंका घेत त्यांच्याही निलंबनाची मागणी करत त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. 

तर, शिवसेनेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा सूत्रधार कोणीतरी आतमधलाच असल्याचा थेट आरोप केला. मंजुळा शेट्येचा खून अंडे आणि पावासाठी नसून ती बाहेर पडल्यानंतर आतल्या काही गोष्टी बाहेर येऊन सांगेल या भीतीपोटी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्‍त केला. 

गणवेशातला अमानुष अत्याचार 
23 जूनला दुपारी सव्वाबाराच्या सुमारालाच महानगर दंडाधिकारी पूरकर यांनी भायखळा येथील महिलांच्या कारागृहाला भेट दिली होती. अर्ध्या तासानंतर त्या निघून गेल्या. तोपर्यंत कारागृहात शांतता होती. तिसऱ्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये तोंडात साडीचा बोळा कोंबलेल्या मंजूळा शेट्येला डांबून ठेवले होते. दंडाधिकारी पूरकर तिकडून निघून जाताच मंजुळाला बाथरूममधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर प्रत्येक बरॅकच्या समोर नेऊन अक्षरशः घोळका करून मंजुळाला मारण्यात आले... परदेशी कैदीसुद्धा "इनफ.. इनफ' करून थकले; पण कोणीच हात- पाय थांबवायला तयार नव्हते... राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानो खलिफे आणि विद्या चव्हाण यांनी भायखळा येथील कारागृहात मंजुळा शेट्येवर झालेल्या अत्याचारानंतर कैद्यांची भेट घेऊन घटना समजून घेतली. त्यानंतर खलिफे यांनी गणवेशातल्या क्रूर थराराची अमानुष कहाणी आज सभागृहाला ऐकवली आणि संपूर्ण सभागृह थिजून गेले. 

मंजुळा त्या दिवशी दिवसभर पाच नंबरच्या बरॅकसमोर निपचित पडून होती, हिला कोणी पाणी दिले तर तुमचीही अशीच अवस्था होईल, असे इतर कैद्यांना धमकावण्यात आले... मंजूळा कण्हत होती... हळू हळू तिचे कण्हणे बंद झाले... इतर कैद्यांनी आरडाओरड सुरू केली. डॉक्‍टर आले आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले... पण मंजूळा मेली असल्याचे तिला घेऊन जातानाच सर्वांना कळले होते... दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका आरोपीला जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्या वेळी तिला मंजुळा मेल्याचे कळले. तिने त्या दिवशी कारागृहात आल्यावर इतर कैद्यांना मंजुळा गेल्याचे सांगितले आणि सर्व महिला कैदी बंड करून उठल्या. पाचव्या मजल्यावरच्या गच्चीचा दरवाजा तोडून त्या गच्चीवर आल्या आणि कारागृहातल्या अमानुष अत्याचाराला तोंड फुटले... 

हे एवढ्यावरच थांबले नाही. मंजुळाला न्याय मिळवून देण्यासाठी बंड केलेल्या या महिलांसाठीची शिक्षा तर अजून बाकीच होती. कारागृहाचे नियम मोडून बंड करून सगळे बिंग बाहेर फोडणाऱ्या महिलांना 30 पोलिसांनी 24 एप्रिलच्या रात्री अक्षरशः तुडवले. रजेवर असलेले तुरुंगाधिकारी इंदूलकर 24 एप्रिलला कारागृहात आले. संपूर्ण कारागृहाचे दिवे बंद करण्यात आले. जवळपास 25 ते 30 पोलिसांनी महिला कैद्यांना घेराव घातला. मोबाईलच्या बॅटरी लावून या सर्व महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली, असे खलिफे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com