संपाची कोंडी फोडण्यासाठी रावते, कर्मचारी यांच्यात बैठक

ज्ञानेश्‍वर बिजले 
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

रावते यांनी कामगार संघटनांच्या राजकारणात अनावश्‍यक हस्तक्षेप वाढविल्याने, तसेच धरसोड धोरण स्विकारल्याने एसटी कामगारांत त्यांच्या विरोधी वातावरण तयार झाले. वेतनवाढीची मागणी करीत संपावर गेलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा इशारा राज्य सरकारने दिल्याने कामगार संतप्त झाले आहेत. राज्य सरकारला संप यशस्वी होईल, अशी अपेक्षा नव्हती.

पुणे : एसटी कामगारांनी सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या संपाची कोंडी फोडण्यासाठी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात काही वेळात बैठक सुरू होत आहे. या संपामुळे गेल्या दीड दिवसांत एक कोटींपेक्षा अधिक प्रवाशांना बससेवा मिळू शकली नाही. दिवाळीच्या प्रारंभी सुरू झालेल्या या संपाची पुरेशी दखल राज्य सरकारने न घेतल्याने राज्यात सर्वत्र प्रवाशांचे मोठे हाल झाले. सर्व बसस्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी दिसत असून, खासगी वाहनचालकांनी त्यांचे प्रवासभाडे दुपटीने वाढविल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसू लागला आहे. 

रावते यांनी कामगार संघटनांच्या राजकारणात अनावश्‍यक हस्तक्षेप वाढविल्याने, तसेच धरसोड धोरण स्विकारल्याने एसटी कामगारांत त्यांच्या विरोधी वातावरण तयार झाले. वेतनवाढीची मागणी करीत संपावर गेलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा इशारा राज्य सरकारने दिल्याने कामगार संतप्त झाले आहेत. राज्य सरकारला संप यशस्वी होईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, राज्यातील सर्व एसटी गाड्या आगारातून बाहेरच न पडल्याने दिवाळीनिमित्त घरी निघालेल्या प्रवासी यांत भरडले गेले. राज्य सरकारने काल दिवसभरात कामगार संघटनांशी चर्चाच केली नाही. 
संपाची कोंडी फुटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी चर्चेसाठी संघटनांच्या नेत्यांना बोलावले. त्याच वेळी कामगारांवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेनंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कामगार नेत्यांची चर्चा होणे अपेक्षित आहे. 

कामगारांची मुख्य मागणी सातवा वेतन आयोग लागू करण्याची आहे. ती मागणी पूर्ण करण्यास फडणवीस यांनी सोमवारी असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे, किमान हंगामी वाढ देण्याची तयारी दर्शवित राज्य सरकार या संपाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करील, अशी शक्‍यता आहे.