खेळ मांडीयेला नागरिकांचा...

संतोष धायबर
बुधवार, 4 जानेवारी 2017

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

राज्यातील नऊ महानगरपालिकांच्या निवडणूका तोंडावर आहेत. ऐन गुलाबी थंडीत 'तापलेल्या' राजकीय वातावरणात नागरिकांना मनोरंजनाची 'उब' देण्याचे काम इच्छुक उमेदवार करत आहेत. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांच्या भरगच्च मेजवानीने 'नागरिकांचाच खेळ मांडीयेला' की काय, असे वाटते आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. वाढदिवसाचे मोठ-मोठे फ्लेक्स जागोजागी दिसताहेत. मतदारसंघातील एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवसही फ्लेक्सच्या माध्यमातून साजरा करायला उमेदवार विसरत नाहीत, हे विशेष. यामध्ये वाढदिवस असणाऱयाचे छायाचित्र छोटे (शोधावे लागते) व उमेदवाराचे छायाचित्र मात्र अंगावर येईल एवढे मोठे. असो. हे उमेदवार निवडणूकीच्या धामधुमीत सर्वसामान्य मतदारांचा वाढदिवस साजरे करतात हेच मोठे नवल.

मतदारसंघातील नागरिकांना देवदर्शन घडवून आणण्यासाठी यात्रांचे नियोजन केले जात आहे. उमेदवाराचे मन दुखवायला नको म्हणून अनेक अबालवृद्ध लक्झरी बसमधून यात्रेला जाताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अशाच एका बसला अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी 'त्या' उमेदवाराने आपण ही यात्रा घडविलीच नसल्याची भूमिका व्यवस्थित पार पाडली होती.

निवडणूका जवळ आल्या की अनेकांना भाबड्या मतदारांची आठवण येऊ लागते. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. पाच वर्षांपासून अशा कार्यक्रमांपासून दूर असलेले मतदार या कार्यक्रमांचा जमेल तसा आस्वाद घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. एका कार्यक्रमाचे निमंत्रण विविध माध्यमातून सातत्याने दिले जाते. अनेक मतदार संघांमध्ये सायंकाळच्या वातावरणामध्ये कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. यामध्ये पैठणीचा खेळ, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, अभिनेता-अभिनेत्रींना आमंत्रित करणे किंवा चिमुकल्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे नियोजन केलेले दिसते. यावेळी खाण्याच्या वस्तूंचे तर सांगायलाच नको.प्रसिद्धी पत्रके, फ्लेक्स, दूरध्वनी कमी पडताहेत म्हणून की काय आता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून भडीमार केला जातोय. हा भडीमार इतका मतदार कार्यक्रमांच्या व निमंत्रणाच्या भडिमाराने त्रासून जात आहेत.

आधी कधीही न पाहिलेला इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तोंडावर अचानक दिसू लागतो. दादा, भाऊसारख्या उपाध्या लावून भला मोठा फ्लेक्स उभारला जातो. या उमेदवारांना सामाजिक कामेच करायची असतील तर ऐन निवडणूकीच्या तोंडावरच का? एवढा अट्टहास कशासाठी? या साध्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळत नाहीत. निवडणूकीपुर्वी दोन महिने अगोदरचे उमेदवार व नंतर निवडून गेलेले उमेदवार हेच असतात का? असा प्रश्नही निरुत्तर राहतो.

एकदा का निवडून आले की यांना भेटण्यासाठी मतदरांना ताटकळत बसावे लागते. अनेकदा भेट तर होतच नाही. पण त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून वेळही दिली जात नाही. त्यांच्या हाताखाली असणाऱयाकडून अरेरावी सुरू होते. निवडणूकीपुर्वीचे हे उमेदवार एवढा मोठा खर्च कशासाठी करतात? त्यांना सामाजिक कामे करायची असतील तर निवडणूक एवढे एकच माध्यम आहे का? हा मनातला प्रश्न वर्षानुवर्षे मनातच आहे. त्याचे उत्तर अद्याप सुटलेले नाही.

ऐन गुलाबी थंडीत 'तापलेल्या' राजकीय वातावरणात नागरिकांना मनोरंजनाची 'उब' देण्याचे काम इच्छुक उमेदवार करत असले तरी त्यांच्या कार्यक्रमांनी नागरिकांचाच खेळ केला जात आहे. यामुळे मतदारांना योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. आजच्या निर्णयावरच पुढील पाच वर्षे महत्त्वाची ठरणार हे मात्र नक्की.

Web Title: Municipal Corporation election blog