जागा बाराशेवर; उमेदवार नऊ हजारांवर!

More than nine thousand candidates in municipal polls across Maharashtra
More than nine thousand candidates in municipal polls across Maharashtra

मुंबई : राज्यातील 10 महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी उद्या (ता. 21) मतदान होत असून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी 3 कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदारांकरिता 43 हजार 160 मतदान केंद्रांची; तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2 लाख 73 हजार 859 कर्मचाऱ्यांसह आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज (सोमवार) येथे दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, 11 जानेवारी 2017 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 16 फेब्रुवारी 2017 रोजी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली होती. या जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी  पहिल्या टप्प्यात मतदान झाले; तर 4 पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 6 जागांबरोबरच त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 16 जागांसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले नव्हते.

श्री. सहारिया म्हणाले की, सर्व 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान होत आहे. महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 167 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी मतमोजणी होईल.

महापालिकानिहाय जागा आणि उमेदवार
महापालिका    जागा        उमेदवार
मुंबई     227 2,275
नागपूर     151 1,135
पुणे    162 1,090
नाशिक    122 821
ठाणे     131 805
पिंपरी-चिंचवड     128 774
अकोला     80 579
अमरावती    87 627
सोलापूर    102 623
उल्हासनगर    78 479
एकूण     1,268 9,208

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com