पंतप्रधान मोदींवर संघच नाराज - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकाच दिवसात देश बदलायचा आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना विरोधकांचा सूड घ्यायचा आहे; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची आहे. तिघांच्या दिशा वेगवेगळ्या असल्याने देशाचे वाटोळे होत आहे. यात पंतप्रधान कोणाचेच ऐकत नसल्याने संघसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

चव्हाण यांनी सोमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष मुळक यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, 'सरकारला तीन वर्षे उलटून गेली तरी एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. आश्‍वासन देताना त्यांनी मागचापुढचा विचार केला नव्हता, हे आता स्पष्ट झाले असून, ज्या सोशल मीडियाने मोदींना हिरो केले होते, तेच आता त्यांना व्हिलन करू लागले आहेत.''

मुंबई ते अहमदाबादचे विमानाचे भाडे दोन हजार रुपयांपेक्षा जास्त नाही. असे असताना तीन हजार रुपये भाडे मोजून बुलेट ट्रेनने कोण प्रवास करणार. हा प्रकल्पच मूर्खपणाचा आहे. जपानला व्यवसाय करायचा असून, कोट्यवधींचा ग्राहक मिळाल्याने जपानचे पंतप्रधान रोड शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांना एखाद्या मंदिरात नेले असते तरी ते आले असते, अशी उपहासात्मक टीकाही चव्हाण यांनी केली.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मुख्यमंत्री वाचवत आहेत. याविरोधात आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

"स्वाइप' कंपन्यांच्या भल्यासाठी निर्णय
नोटाबंदी करू नये, असा सल्ला सर्वच अर्थतज्ज्ञांनी पंतप्रधानांना दिला होता. यानंतरही त्यांनी निर्णय घेतला. अमेरिकेतील "स्वाइप' कंपन्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यात घोटाळा झाल्याचा आपला दावा नाही. कंपन्यांनी आपला व्यवसाय केला. मात्र आपल्या देशाचे भले कशात आहे, याचा पंतप्रधानांनी विचार केला नाही, असे चव्हाण म्हणाले.